Duleep Trophy 2024 Updated Squad for 2nd Round: दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीचे सामने १२ सप्टेंबरपासून खेळवले जाणार आहेत. याआधी बीसीसीआयने नव्या संघाची घोषणा केली आहे. पुढील फेरीसाठी अनेक संघांमध्ये मोठे बदल दिसून आले आहेत. बांगलादेशसोबतच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी निवडलेल्या खेळाडूंच्या जागी हे बदल करण्यात आले आहेत. नव्या खेळाडूंची प्रत्येक संघात वर्णी झाली आहे तर भारत ए संघाला नवा कर्णधार मिळाला आहे.
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया १३ सप्टेंबरपासून सुरूवात करणार आहे, यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणाही केली आहे. त्यामुळे या संघात निवडलेले खेळाडू दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीचा सामना खेळू शकणार नाहीत. दुलीप ट्रॉफीमध्ये या खेळाडूंच्या जागी कोणत्या नवीन खेळाडूंना संधी मिळाली आहे ते जाणून घेऊया.
गिलच्या जागी नवा कर्णधार
दुलीप ट्रॉफीमध्ये भारत-ए संघाचा कर्णधार शुबमन गिलची भारतीय संघात निवड झाल्यानंतर मयंक अग्रवालचे नशीब उजळले आहे. त्याच्याकडे भारत-ए संघाची कमान सोपवण्यात आली आहे. शुबमन गिलच्या जागी रेल्वेच्या प्रथम सिंगचा, केएल राहुलच्या जागी विदर्भाच्या अक्षय वाडकरचा आणि ध्रुव जुरेलच्या जागी आंध्र प्रदेशच्या एसके रशीदचा भारत-ए संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर कुलदीप यादवच्या जागी शम्स मुलानी आणि आकाशदीपच्या जागी आकिब खानला संधी देण्यात आली आहे.
हेही वाचा – Babar Azam: ऐनवेळी पँट मिळाली नाही, बाबर आझम थेट टॉवेल गुंंडाळून आला; VIDEO व्हायरल
भारत बी संघात रिंकू सिंगला संधी
या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत भारत-बी कडून खेळलेले यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत यांची बांगलादेशविरुद्धच्या टीम इंडियात निवड झाली आहे. निवडकर्त्यांनी यशस्वी जैस्वालच्या जागी सुयश प्रभुदेसाई आणि ऋषभ पंतच्या जागी टीम-बीमध्ये रिंकू सिंगची निवड केली आहे. त्याचबरोबर संघात समाविष्ट असलेला वेगवान गोलंदाज यश दयाल यालाही टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे, त्याच्या जागी हिमांशू मंत्रीचा संघात समावेश करण्यात आला आहे.
भारत-डी संघातही बदल
अक्षर पटेलला दुलीप ट्रॉफीच्या इंडिया-डी संघातून भारतीय वरिष्ठ संघात स्थान मिळाले आहे. त्यामुळे अक्षर पटेलच्या जागी निशांत सिंधूचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी तुषार देशपांडे दुखापतीमुळे दुसऱ्या फेरीतून बाहेर पडला असून त्याच्या जागी भारत-अ संघाच्या विद्वथ कवेरप्पाला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याच वेळी, भारत-सी मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीसाठी सुधारित संघ
भारत ए संघ :
मयंक अग्रवाल (कर्णधार), रियान पराग, तिलक वर्मा, शिवम दुबे, तनुष कोटियन, प्रसिध कृष्णा, खलील अहमद, आवेश खान, कुमार कुशाग्रा, शाश्वत रावत, प्रथम सिंग, अक्षय वाडकर, एसके रशीद, शम्स मुलाणी, आकिब खान
हेही वाचा – Saina Nehwal: ऑलिम्पिक पदक गिफ्ट मिळालं म्हणणाऱ्यांवर सायना नेहवालचा संताप; म्हणाली, “आधी ऑलिम्पिकसाठी…”
भारत बी संघ :
अभिमन्यू इश्वरन (कर्णधार), सर्फराज खान, मुशीर खान, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, मुकेश कुमार, राहुल चहर, आर साई किशोर, मोहित अवस्थी, एन जगदीसन (यष्टीरक्षक), सुयश प्रभुदेसाई, रिंकू सिंग, हिमांशू मंत्री (यष्टीरक्षक)
इंडिया डी संघ :
श्रेयस अय्यर (कर्णधार), अथर्व तायडे, यश दुबे, देवदत्त पडिक्कल, रिकी भुई, सारांश जैन, अर्शदीप सिंग, आदित्य ठाकरे, हर्षित राणा, आकाश सेनगुप्ता, केएस भरत (यष्टीरक्षक), सौरभ कुमार, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), निशांत सिंधू, विदवथ कवरप्पा.