कोईम्बतूर : पृथ्वी शॉच्या (१४२) शतकानंतर अरमान जाफर (४९) आणि हेत पटेल (६७) यांनी केलेल्या चांगल्या फलंदाजीमुळे पश्चिम विभागाच्या संघाने दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. उपांत्य फेरीत पश्चिम विभागाने दुसऱ्या डावात ३७१ धावांची मजल मारत मध्य विभागापुढे ५०१ धावांचे आव्हान ठेवले. याचा पाठलाग करताना तिसऱ्या दिवसअखेर मध्य विभागाची २ बाद ३३ अशी स्थिती होती.
पश्चिम विभागाने तिसऱ्या दिवशी ३ बाद १३० धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. सलामीवीर पृथ्वीने आक्रमक शैलीतील फलंदाजी सुरू ठेवताना १४० चेंडूंत १५ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने १४२ धावांची खेळी केली. तसेच त्याने मुंबई संघातील सहकारी अरमानसोबत ११४ धावांची भागीदारी रचली. अरमानने १०० चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४९ धावा केल्या. पृथ्वी आणि अरमान ठरावीक अंतराने बाद झाले. मग हेत पटेलने तळाच्या फलंदाजांना हाताशी घेत पश्चिम विभागाची आघाडी वाढवली. हेतने १५३ चेंडूंत चार चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने ६७ धावांची खेळी केली. ५०१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मध्य विभागाची अडखळती सुरुवात झाली. वेगवान गोलंदाज चिंतन गाजाने यश दुबे (१४) आणि मुंबईकर डावखुरा फिरकीपटू शम्स मुलानीने हिमांशू मंत्री (१८) यांना माघारी पाठवले.
संक्षिप्त धावफलक
- पश्चिम विभाग (पहिला डाव) : २५७
- मध्य विभाग (पहिला डाव) : १२८
- पश्चिम विभाग (दुसरा डाव) : १०४.४ षटकांत सर्वबाद ३७१ (पृथ्वी शॉ १४२, हेत पटेल ६७, अरमान जाफर ४९; कुमार कार्तिकेय ३/१०५)
- मध्य विभाग (दुसरा डाव) : ९.२ षटकांत २ बाद ३३ (हिमांशू मंत्री १८; शम्स मुलानी १/०, चिंतन गाजा १/१४)