पीटीआय, कोईम्बतूर : मुंबईकर डावखुरा फिरकीपटू शम्स मुलानीच्या (४/५१) दुसऱ्या डावातील प्रभावी माऱ्याच्या बळावर पश्चिम विभागाने अंतिम सामन्यात दक्षिण विभागाचा २९४ धावांनी धुव्वा उडवत दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले. पश्चिम विभागाने दिलेल्या ५२९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण विभागाची चौथ्या दिवसअखेर ६ बाद १५४ अशी स्थिती होती. पाचव्या दिवशी दक्षिण विभागाच्या रवी तेजाने (९७ चेंडूंत ५३) काहीशी झुंज दिली. तसेच साई किशोरने ८२ चेंडू खेळून काढताना सात धावा केल्या. या दोघांनी १५७ चेंडूंत ५७ धावांची भर घातल्यावर साई किशोरला चिंतन गाजाने बाद केले. यानंतर मुलानीने सलग दोन षटकांत तेजा आणि बासिल थम्पीला माघारी पाठवत पश्चिम विभागाला विजयासमीप नेले. अखेरीस मुंबईकर फिरकीपटू तनुष कोटियनने कृष्णप्पा गौतमला (१७) बाद करत दक्षिण विभागाचा डाव ७१.२ षटकांत २३४ धावांत संपुष्टात आणला आणि पश्चिम विभागाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक
- पश्चिम विभाग (पहिला डाव) : २७०
- दक्षिण विभाग (पहिला डाव) : ३२७
- पश्चिम विभाग (दुसरा डाव) : ४ बाद ५८५ डाव घोषित
- दक्षिण विभाग (दुसरा डाव) : ७१.२ षटकांत सर्वबाद २३४ (रोहन कुन्नुमल ९३, रवी तेजा ५३; शम्स मुलानी ४/५१, जयदेव उनाडकट २/२८)
रहाणेकडून जैस्वालला मैदानाबाहेर जाण्याचे आदेश!
कोईम्बतूर : दुलीप करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अखेरच्या दिवशी प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजाला डिवचणाऱ्या (स्लेजिंग) यशस्वी जैस्वालला कर्णधार अजिंक्य रहाणेने मैदानाबाहेर जाण्याचे आदेश दिले. अखेरच्या दिवशी दक्षिण विभागाकडून रवी तेजाने पश्चिम विभागाच्या गोलंदाजांना चांगली झुंज दिली. त्याने ९७ चेंडूंत ५३ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तेजाला २० वर्षीय जैस्वालने डिवचण्याचा प्रयत्न केला. याबद्दल तेजाने पंचांकडे तक्रार केली आणि पंचांनी जैस्वालला ताकीद दिली. मात्र, त्यानंतरही जैस्वालने डिवचणे सुरूच ठेवले. अखेर पश्चिम विभागाचा कर्णधार रहाणेने मध्यस्ती करत दक्षिण विभागाच्या डावातील ५७व्या षटकात जैस्वालला मैदानाबाहेर जाण्याचे आदेश दिले. त्यामुळे पश्चिम विभागाचे केवळ १० खेळाडू मैदानावर होते. जैस्वाल सात षटके मैदानाबाहेर होता.