बंगळूरु : देशांर्गत क्रिकेट स्पर्धेतील महत्त्वाची स्पर्धा असलेली दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा पुढील वर्षीपासून जुन्या म्हणजेच विभागीय पातळीवर खेळविण्याची मागणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध राज्य संघटनांकडून करण्यात आली.

गेल्या दोन हंगामात या स्पर्धेचे स्वरूप बदलून भारत ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ अशा संघात ही स्पर्धा पार पडली होती. मात्र, या चारच संघांमधील स्पर्धेमुळे देशातील विविध विभागातील खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखविण्याची पुरेशी संधी मिळत नसल्यामुळे पुन्हा मध्य, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि ईशान्य अशा जुन्या विभागीय स्तरावर स्पर्धा घेण्यात यावी असा मुद्दा या बैठकीत प्राधान्याने मांडण्यात आला.

चार संघांतच स्पर्धा घेतल्याने संबंधित विभागातील खेळाडूंना योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही, असा मुद्दा अनेक राज्य संघटनांनी मांडला. जुन्या विभागीय पद्धतीने स्पर्धा खेळविण्यात आल्यास ही त्रुटी दूर होऊ शकते असे राज्य संघटनेच्या एका प्रतिनिधीने सांगितले.

हेही वाचा >>> ENG vs AUS: हॅरी ब्रुकने मोडला विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड, ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत इतक्या धावा करत रचला विक्रम

नव्या सचिवाच्या निवडीविषयी बैठकीत फारशी चर्चा झाली नाही. अर्थात, हा मुद्दाही विषयपत्रिकेवर नव्हता. विद्यामान सचिव नोव्हेंबरमध्ये ‘आयसीसी’चे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. त्यामुळे त्यापूर्वी सचिवाची निवड आणि ‘आयसीसी’मधील प्रतिनिधित्व याविषयी निर्णय लवकर घेण्यात यावे अशी विनंती मात्र या वेळी करण्यात आल्याचे एका राज्य संघटनेच्या प्रतिनिधीने सांगितले.

सध्या दिल्लीचे रोहन जेटली, ‘बीसीसीआय’चे कोषाध्यक्ष आशिष शेलार, सहसचिव देवजित सैकिया आणि गुजरातचे अनिल पटेल सचिव पदाच्या शर्यतीत असल्याचे मानले जात आहे. त्याच वेळी ‘आयसीसी’वरील प्रतिनिधित्व करण्यासाठी ‘बीसीसीआय’च्या कार्यकारिणी सदस्यांना दोन नावे सुचविण्यास सांगण्यात आल्याचे समजते.

त्याच वेळी अरुण धुमल आणि अविशेक दालमिया यांची सर्वसाधारण सभेचे प्रतिनिधी म्हणून ‘आयपीएल’च्या कार्यकारी परिषदेमध्ये निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे क्रिकेटपटूंचे प्रतिनिधी म्हणून माजी खेळाडू व्ही. चामुंडेश्वरनाथ यांची निवड करण्यात आली.