न्यूझीलंडमध्ये पार पडलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियावर मात करुन भारतीय संघ मायदेशी परतला. यावेळी विमानतळावर जगज्जेत्या भारतीय संघाचं पाठीराख्यांनी धुमधडाक्यात स्वागत केलं. मुंबईत आगमन झाल्यानंतर कर्णधार पृथ्वी शॉ आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पत्रकार परिषदेत सर्वांशी संवाद साधला. यावेळी आयपीएलच्या अकराव्या हंगामासाठी होणाऱ्या लिलावाचा आठवडा माझ्यासाठी प्रशिक्षक म्हणून कसोटीचा काळ ठरल्याचं राहुल द्रविडने मान्य केलं.

अवश्य वाचा – मान गये राहुल! पारितोषिकाची रक्कम सर्वांना समानच मिळायला हवी; द्रविडची BCCI ला सूचना

विश्वचषकाच्या साखळी फेरीत भारतीय संघातल्या अनेक खेळाडूंनी आक्रमक कामगिरी करत आयपीएलमधील संघमालकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. कमी वयात आयपीएलसारख्या स्पर्धांमधून मिळणाऱ्या लाखो रुपयांमुळे कोणत्याही खेळाडूचं आपल्या खेळावरुन लक्ष विचलीत होण्याची शक्यता असते. मात्र सुदैवाने भारतीय संघातील खेळाडूंनी या लिलावाचा आपल्या कामगिरीवर काही केल्या परिणाम होऊ दिला नाही. “तो आठवडा माझ्यासाठी प्रशिक्षक म्हणून कसोटीचा होता. खेळाडूंचं सरावात लक्ष लागेलं की नाही याची मला चिंता होती. मात्र खेळाडूंनी माझी भिती फोल ठरवत नेहमीप्रमाणे सरावात भाग घेतला. मात्र त्या काळात मी प्रचंड तणावाखाली होतो.” द्रविडने पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं दिली.

अवश्य वाचा – विश्वविजेतेपद सदैव स्मरणात राहील – पृथ्वी शॉ  

या कालावधीत खेळाडूंनी दाखवलेली समज मला प्रचंड आवडली. सोशल मीडियावर व्यक्त होण्यापासून ते अनेक गोष्टींमध्ये खेळाडू एखाद्या समजुतदार व्यक्तीप्रमाणे वागले. त्यामुळे या गोष्टीसाठी त्यांचं कौतुक करावच लागेल असं राहुल द्रविड आवर्जून म्हणाला. कर्णधार पृथ्वी शॉ, शिवम मवी, कमलेश नागरकोटी, शुभमन गिल आणि अनुकूल रॉय या १९ वर्षाखालील संघातील खेळाडूंना आयपीएलमध्ये विविध संघमालकांनी बोली लावून आपल्या संघात घेतलं आहे. मात्र आगामी काळात आपल्या खेळावर अधिक लक्ष केंद्रीत करुन खेळ खालावला जाणार नाही याची काळजी घेण्याचा सल्लाही द्रविडने आपल्या खेळाडूंना दिला.

अवश्य वाचा – BLOG: आशा-निराशेच्या चौकोनात भारतीय क्रिकेट!!