Team India Coach offer on Sehwag: भारतीय संघाचा माजी आक्रमक सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागला काही वर्षांपूर्वी टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्याची संधी चालून आली होती. मुलतानच्या सुलतानने एका वृत्तपत्राच्या मुलाखत कार्यक्रमात बोलताना सांगितले की, त्याला सहा वर्षांपूर्वी टीम इंडियाचे प्रशिक्षक बनण्याची ऑफर आली होती, पण टीम इंडियातील वादामुळे त्याची इच्छा नव्हती आणि म्हणूनच त्याने ती नाकारली. या काळात विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यातील वादाचाही सेहवागने उल्लेख केला.
अमर उजाला या वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना जेव्हा त्याला प्रश्न विचारला की, “तो भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यासाठी पुढे का येत नाही?” यावर उत्तर देताना सेहवाग म्हणाला की, “मी प्रशिक्षक पदासाठी अर्ज केला होता पण माझी निवड झाली नाही. माझी निवड होणार नाही हेही मला माहीत होते. मला बीसीसीआयचे तत्कालीन सचिव अमिताभ चौधरी यांनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची विनंती केली होती. त्यामुळे तो अर्ज केला होता.”
पुढे बोलताना सेहवागने त्याला माजी बीसीसीआय सचिव अमिताभ चौधरी भेटल्यावर काय म्हणाले हे सांगितले. चौधरी म्हणाले सेहवागला की, “विराट कोहली आणि अनिल कुंबळे यांच्यात काही मतभेद आहेत, त्यामुळे तुम्ही प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारावी अशी आमची इच्छा आहे.” तेव्हा सेहवागने त्यांना सांगितले की, “मला प्रशिक्षक बनायचे नाही, कारण मी भारतीय संघासाठी जवळपास १५ वर्षे खेळलो आहे आणि १५ वर्षांत मला माझ्या कुटुंबासोबत दोन महिनेही घालवता आले नाहीत.”
काय आहे विराट-कुंबळे वाद?
वास्तविक, २०१६ मध्ये अनिल कुंबळे भारतीय संघाचे प्रशिक्षक बनले होते. त्यानंतर विराट कोहली कसोटीत भारतीय संघाचा कर्णधार होता. २०१७च्या सुरुवातीला, धोनीने वन डे आणि टी२०चे कर्णधारपद सोडल्यानंतर विराट मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्येही टीम इंडियाचा कर्णधार बनला. मात्र, त्यानंतर अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये विराट आणि कुंबळे यांच्यात समन्वय नसून दोघांमध्ये वाद असल्याचे सांगण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही खेळाडूंनी आरोप केला होता की कुंबळे आणि विराट त्यांच्या इच्छेनुसार प्लेइंग-११ निवडू इच्छित होते आणि त्यामुळे वाद वाढला. यानंतर २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमधील पराभवानंतर कुंबळेने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. यानंतर रवी शास्त्री टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनले.
सेहवाग यावर म्हणाला, “जर मी प्रशिक्षक झालो तर भारतीय संघाला परतण्यासाठी ८-९ महिन्यांचा वेळ द्यावा लागेल. माझी मुलं मोठी होत आहेत. मला त्यांच्यासोबत वेळ घालवायचा आहे, त्यांना क्रिकेट शिकवावे लागेल. यावर अमिताभ म्हणाले होते की, “नाही-नाही तुम्ही संघासोबत जा, मग वाटत असेल तर राहा, नाहीतर ठीक आहे. यानंतर मी माझ्या पत्नी आणि मुलांना हे सांगितले आणि त्यांना विचारले, ते खूप उत्साहित होते की तुम्ही टीम इंडियासोबत परत काम कराल. त्यामुळे या उत्साहात मी बॅग भरली, पण आधीच्या वादामुळे मी हा निर्णय रद्द केला आणि यात सध्या तरी पडायचे नाही असे ठरवले.”