Dwarkanath Sanzgiri Died in Lilavati Hospital लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. संझगिरी यांनी मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. पेशाने सिव्हिल इंजिनीयर असलेले द्वारकानाथ संझगिरी मुंबई महापालिकेत उच्च पदावर काम करत होते. मात्र क्रिकेटवर लिहिणं, बोलणं आणि मराठी साहित्यातली त्यांची रुची त्यामुळे त्यांच्यातला क्रिकेट समीक्षक घडला. मराठी क्रिकेट रसिकांनी त्यांच्या क्रिकेटवरच्या लेखांना आणि इतर लेखांना कायमच दाद दिली होती. क्रिकेट या खेळाबाबतची माहिती देणारा, त्यातली सौंदर्यस्थळं लेखणीने टिपणारा एक अवलिया माणूस काळाच्या पडद्याआड गेला आहे. क्रिकेट विश्व, त्यावरच्या सुरसकथा लिहिणारी लेखणी शांत झाली आहे. द्वारकानाथ संझगिरी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहे. या बातमीने संपूर्ण क्रिकेट विश्व हळहळलं आहे.
हर्षा भोगले यांची पोस्ट
हर्षा भोगले यांनीही द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाची बातमी सांगत तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. ३८ वर्षांपासून माझा मित्र असणारा माणूस आज जग सोडून गेला आहे. त्याच्या लिखाणाचं स्मरण कायम राहिल. माझा मित्र द्वारकानाथ हा जे व्हिज्युअलाईज करायचा तेच त्याच्या लिखाणात उतरायचं. माझ्या मित्राच्या कुटुंबासह माझ्या सहवेदना. या आशयाची पोस्ट हर्षा भोगले यांनी केली आहे.
द्वारकानाथ संझगिरी यांची कारकीर्द थोडक्यात
द्वारकानाथ संझगिरी यांनी एकाच वेळी दोन क्षेत्रांत काम केले, त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून नोकरी केली. तेथून ते २००८ या वर्षी मुख्य अभियंता, पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून सेवानिवृत्त झाले. त्याचबरोबर त्यांनी स्तंभलेखक, लेखक आणि सूत्रसंचालक म्हणूनही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. १९७० च्या उत्तरार्धात लेखन कारकीर्द सुरू करून त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘दिनांक’ आणि ‘श्री’ यासारख्या मासिकांमध्ये नियमितपणे योगदान दिले. भारताने इंग्लंडमध्ये १९८३ चा विश्वचषक जिंकल्यानंतर, त्यांनी इतर काही मित्रांसह ‘एकच षटकार’ हे पाक्षिक क्रीडा मासिक सुरू केले होते, ज्यासाठी द्वारकानाथ संझगिरी यांनी कार्यकारी संपादक म्हणून काम केले.
द्वारकानाथ संझगिरी यांची ४० पुस्तकं प्रकाशित
द्वारकानाथ संझगिरी यांनी १९८३ पासून ते आजपर्यंतचे सर्व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्ल्ड कप देखील कव्हर केले आहेत. स्तंभलेखनाव्यतिरिक्त, संझगिरी यांनी प्रवास, सामाजिक समस्या, क्रीडा आणि चित्रपट अशा विविध विषयांवर ४० पुस्तके लिहिली आहेत.
आशिष शेलार यांनी काय भावना व्यक्त केल्या आहेत?
बीसीसीआयचे कोषाध्यक्ष आशिष शेलार यांनी लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, अतिशय दु:ख वाटलं, द्वारकानाथ संझगिरी हे क्रिकेटप्रेमी, क्रिकेटवर रिसर्च करणारे, क्रिकेटमधील खाचखळग्यांचं ज्ञान असलेले, क्रिकेट, क्रिकेटीयर्स, क्रिकेट रेकॉर्डर्स याचे इनसायक्लोपीडिया असलेले, क्रिकेटच्या संदर्भातील प्रसंग याचं विश्लेषण करणारे आमचे मित्र संझगिरी गेले याचं दु:ख झाले असं म्हटलं आहे.
मैदानावर घडणाऱ्या गोष्टी आपल्या अनोख्या शैलीत फर्मासपणे मांडणारे लेखक आणि क्रिकेट अभ्यासक द्वारकानाथ संझगिरी यांचं जाणं क्रीडाविश्वाला चटका लावणारं आहे. हरलं कोण, जिंकलं कोण यापल्याड जात मैदानावरच्या घटनांना जिवंत करत खेळाडूंमधलं माणूसपण उलगडणारं त्यांचं लिखाण चिरंतन लक्षात राहील.
सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर हे भारतीय क्रिकेटचे दिग्गज शिलेदार. मुंबईतल्या मैदानांवर क्रिकेटची धुळाक्षरं गिरवलेल्या या दोघांनी भारतीय क्रिकेटची पताका सातत्याने अभिमानाने फडकावत ठेवली. हे दोघे मैदानावर नवनवी शिखरं गाठत असताना त्यांच्या पराक्रमाचं यथार्थ वर्णन संझगिरींनी केलं. सर्वसामान्य माणसाला समजेल, उमजेल अशा भाषेत, अशा उदाहरणांसह त्यांनी मैदानावरच्या गोष्टी वाचकांसमोर मांडल्या. खेळ हा अनेकांसाठी दूरचा विषय असतो. पेपर आवर्जून वाचणारी अनेक माणसं खेळांच्या पानांना अव्हेरतात. पण संझगिरींच्या लिखाणाने ही दरी भरुन काढली. खेळातल्या तांत्रिक गोष्टी ललित भाषेत कशा मांडाव्यात याचा वस्तुपाठच त्यांनी सादर केला. त्यांचं लिखाण कधीच कंटाळवाणं रटाळ झालं नाही. खेळाडूतला माणूस दिसला तर खेळावरचं लिखाणही ललित होऊ शकतं हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिलं.
संझगिरींनी वृत्तांकन केलं तो काळ सोशल मीडियाच्या आक्रमणापूर्वीचा. पत्रकारांना खेळाडूंशी बोलता यायचं, भेटता यायचं असा काळ. हे भेटणं किती आशयघन असू शकतं हे संझगिरींच्या लेखणीने दाखवून दिलं. सचिनची बॅट बोलत असताना, संझगिरींची लेखणी तळपत राहिली. सचिन तेंडुलकर कसा घडला, त्याच्या कारकिर्दीचे कंगोरे, त्याच्या आयुष्यातली श्रद्धेय माणसं, त्याचा मित्रपरिवार, त्याच्यावर कोणाचा प्रभाव आहे, अत्युच्यपदी जाण्यासाठी सचिन कशी मेहनत घेतो हे सगळं संझगिरींनी समस्त मराठीजनांना उलगडून सांगितलं. सचिनचं मोठेपण सर्वसामान्य माणसाला समजावून देण्यात संझगिरींचा मोलाचा वाटा होता. खेळाचं वार्तांकन करताना त्यांनी वापरलेल्या उपमा, विशेषणं क्रीडारसिकांच्या मनाचा वेध घेत. सिनेमा, संगीत आणि क्रिकेट या तिन्हीचा सुरेख मिलाफ घडवत त्यांची लेखणी बोलत असे. बंदिस्त कार्यालयात न बसता प्रत्यक्ष मैदानावर जाऊन वार्तांकन करण्याचा त्यांचा पिंड होता. टीम इंडिया विदेशात खेळत असताना तिथे जाऊन सातत्याने वार्तांकन करणाऱ्या मोजक्या मराठी पत्रकारांमध्ये त्यांचा समावेश होतो.