क्रिकेटमध्ये काही खेळाडू एकमेकांचे जीवलग मित्र असतात. मैदानावर आणि मैदानाच्या बाहेरही ते आपल्यातील जिव्हाळ्याचे संबंध सर्वांसमोर आणतात. वेस्ट इंडिजचे ड्वेन ब्राव्हो आणि कायरन पोलार्ड यांची मैत्री संपूर्ण जगाला ठाऊक आहे. दोघेही मैदानावर आमनेसामने असले, तरीही एकमेकांशी मस्करी करत असल्याचे आपण पाहिले आहे. आता या दोघांचा सोशल मीडियावरील एक संवाद सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
ब्राव्होने त्याचा मुलगा डीजे ब्राव्हो ज्युनियरच्या वाढदिवसानिमित्त त्याचे काही फोटो पोस्ट केले होते. ”आजचा दिवस तुझा आहे. तुझे बाबा तुझ्यावर फार प्रेम करतात”, असे ब्राव्होने कॅप्शनमध्ये म्हटले होते. या पोस्टवर कायरन पोलार्डने कमेंट करत हॅपी बर्थ डे यंग ब्राव्हो असे म्हटले. त्यावर लगेच ड्वेन ब्राव्होने कमेंट करत, ”तो तुझा जावई आहे” अशी कमेंट केली.
ब्राव्होच्या या कमेंटवर पोलार्डनेही मजेशीर उत्तर दिले. ”स्वप्न पाहायचे सोडून दे, तू रोज एवढ्या उशीरा का झोपतोस ?”, असा उपहासात्मक टोला पोलार्डने ब्राव्होला लगावला. पोलार्डला दोन मुली आणि एक मुलगा अशी तीन अपत्य आहेत.
हेही वाचा – IPL 2021 : आर या पार..! प्लेऑफ गाठण्यासाठी मुंबई इंडियन्सला करावी लागणार ‘त्या’ पराक्रमाची पुनरावृत्ती!
सध्या हे दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांकडून खेळत आहेत. ड्वेन ब्राव्होच्या टीमने प्लेऑफमध्ये स्थान मिळवले असताना, पोलार्डचा मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी अजूनही संघर्ष करत आहे. आज मुंबईचा संघ राजस्थान रॉयल्सविरुद्ध महत्त्वाचा सामना खेळणार आहे.