आयपीएलचा सोळावा हंगाम पुढील वर्षी खेळवला जाणार आहे. त्याचबरोबर सोळाव्या हंगामाचा लिलाव या महिन्याच्या २३ तारखेला कोची येथे होणार आहे. या अगोदचर सीएसके संघाने दोन मोठे निर्णय घेतले आहेत. चेन्नई सुपर किंग्जने लक्ष्मीपती बालाजी पुढील हंगामात संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक नसल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्याचबरोबर संघाने वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू ड्वेन ब्राव्होला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.
चेन्नई सुपर किंग्जने एका निवेदनात म्हटले आहे की, ”पुढील वर्षीच्या आयपीएलसाठी ड्वेन ब्राव्होची संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लक्ष्मीपती बालाजी आयपीएलच्या पुढील सीझनमधून ब्रेक घेत आहे, वैयक्तिक वचनबद्धता आहे, परंतु सीएसके अकादमीसाठी उपलब्ध असेल.”
या नियुक्तीवर आनंद व्यक्त करताना ड्वेन ब्राव्हो म्हणाला, ”मी याचीच वाट पाहत होतो, कारण मी माझ्या क्रिकेट करिअरनंतर असे काहीतरी शोधत आहे. मला गोलंदाजांसोबत काम करायला आवडते, मी त्याची वाट पाहत आहे. मला वाटत नाही की मला गोलंदाजापासून प्रशिक्षकापर्यंत काहीही बदलावे लागेल. जरी मी खेळत असतो, तरी फलंदाजांच्या एक पाऊल पुढे कसे राहायचे याचे गोलंदाजांसोबत नियोजन केले असते. फक्त हो, एवढा फरक असेल की आता मी खेळाडूंसोबत मैदानावर नसेन.”
ड्वेन ब्राव्हो हा केवळ चेन्नई सुपर किंग्जसाठीच नव्हे तर आयपीएलच्या सर्वकालीन विक्रमात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याने १५८ डावात १८३ विकेट्स घेतल्या आहेत. २२ धावांत ४ विकेट्स घेणे हा त्याचा सर्वोत्तम स्पेल आहे.