खेळावरील निष्ठा व शारीरिक तंदुरुस्ती याबाबत भारताचा लिअँडर पेस याचा आदर्श सर्वानी घेण्याजोगा आहे. त्यामुळेच त्याच्याबरोबर प्रदर्शनीय सामन्यात सहभागी होण्यास मी लगेच मान्यता दिली व आता या सामन्यासाठी मी खूप उत्सुक झाले आहे, असे जॉर्जियाची अव्वल दर्जाची टेनिसपटू ओक्साना कलानिशिकोवा हिने येथे सांगितले.
डेक्कन जिमखाना क्लब येथे सुरू असलेल्या प्रीमियर टेनिस लीगच्या निमित्ताने बुधवारी प्रदर्शनीय सामना होणार आहे. मिश्रदुहेरीच्या या सामन्यात पेस सहभागी होत असून, या सामन्यासाठी ओक्साना हिलादेखील निमंत्रित करण्यात आले आहे. ओक्साना हिने गतवर्षी शिवछत्रपती क्रीडानगरीत झालेल्या सव्वा लाख डॉलर्स पारितोषिकाच्या स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. जागतिक क्रमवारीत एकेरीत तिला पहिल्या शंभर खेळाडूंमध्ये स्थान आहे.
पेस याच्याबरोबर किंवा त्याच्याविरुद्ध मिश्रदुहेरीत कधी खेळण्याची वेळ आलेली नाही, मात्र अनेक ग्रँड स्लॅम स्पर्धामध्ये मी त्याचा खेळ पाहिला असून मी त्याची चाहतीच झाली आहे. प्रौढत्वाकडे झुकल्यानंतरही मैदानावरील त्याचा उत्साह, त्याचे पदलालित्य खरोखरीच अतुलनीय असते. त्याच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये त्याच्याबरोबर मिश्रदुहेरीत खेळण्याचीही माझी तयारी आहे, असे ओक्साना हिने सांगितले.
ओक्साना हिला दुखापतीमुळे थोडे दिवस एकेरीच्या सरावावर लक्ष केंद्रित करता आले नव्हते. त्याबाबत विचारले असता ती म्हणाली, एकेरीकरिता आवश्यक असणारी तंदुरुस्ती अद्याप माझ्याकडे नाही. पायातील स्नायूंच्या दुखापतीवर मी खूप दिवस उपचार घेत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी मला सध्या दुहेरीत खेळण्यास परवानगी दिली आहे.
जागतिक क्रमवारीत पहिल्या शंभर क्रमांकांमध्ये असलेल्या खेळाडूंनाच चांगले मानधन व प्रायोजकत्व मिळत असते. पहिल्या शंभर खेळाडूंमध्ये स्थान नाही याचा अर्थ तुमचा खेळ खराब आहे असे मानले जाते. या क्रमांकांपलीकडे असलेल्या खेळाडूंमध्येही चांगली गुणवत्ता असते. हे आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणाऱ्या संघटकांनी लक्षात घेतले पाहिजे असेही ओक्साना हिने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा