Ind vs Eng : इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूट याला भारतातील IPL स्पर्धेत खेळण्यास इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून नकार देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आणि त्यानंतर नियोजित असलेली अॅशेस मालिका या गोष्टी ध्यानात घेत असा निर्णय घेण्यात आल्याचे समजते आहे. या दोन महत्वाच्या स्पर्धाच्या आधी पुरेशी विश्रांती मिळावी, यासाठी इंग्लंडचा कर्णधार जो रूट याला पुढील वर्षी IPL खेळू नये असा सल्ला देण्यात आला असून त्याला या स्पर्धेसाठी बोर्डाकडूनच नकार देण्यात आला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डानेच (ECB) तसे संकेत दिले आहेत.

इंग्लंडचा संघ सध्या भारतीय संघाविरूद्ध कसोटी मालिका खेळत आहे. मग हा संघ श्रीलंका आणि विंडीजविरुद्ध क्रिकेट मालिका खेळणार आहे. दरम्यान रूट आणि जोस बटलर यांना बीग बॅश लीगमधील सिडनी थंडर्स क्लबने पहिल्या टप्प्यात खेळण्यासाठी करारबद्ध केले आहे. श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापूर्वी हे दोघे त्या लीगमध्ये खेळणार आहेत. पण अॅशेस मालिका आणि विश्वचषक स्पर्धा या तुलनेने मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या स्पर्धा आहेत, असे ECBचे मानणे असल्याची शक्यता आहे. म्हणून असा निर्णय देण्यात आला असल्याचे बोलले जात आहे.

भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेत कर्णधार रूटला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. तीन सामन्यांत त्याला केवळ १४२ धावा करता आल्या आहेत. पहिल्या कसोटीतील ८० धावा बगलता त्याला आपली छाप उमटवता आलेली नाही. दरम्यान, भारताने तिसरी कसोटी जिंकून मालिकेतील आव्हान जिवंत ठेवले आहे. त्यामुळे इंग्लंडला मालिका जिंकायची असल्यास रूटने लयीत परतणे आवश्यक आहे.