भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेला एजबस्टन कसोटी सामना मैदानावरील आणि मैदानाबाहेरील घडामोडींसाठी प्रचंड चर्चेत राहिला. या सामन्याचा तिसरा दिवस विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टोच्या वादामुळे गाजला. मैदानावर झालेल्या या वादाचे पडसाद सोशल मीडियावरदेखील बघायला मिळाले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जॉनी बेअरस्टोने हसत-खेळत प्रतिक्रिया देऊन या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, इंग्लंड क्रिकेट नियामक मंडळाने (ईसीबी) ही गोष्ट फारच जिव्हारी लावून घेतल्याचे दिसले. ईसीबीने विराट कोहलीची खिल्ली उडवणारे ट्वीट केले. भारतीय क्रिकेट चाहत्यांनी याबद्दल ईसीबीला ट्वीटरवर चांगलेचे फटकारले आहे.

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू झाल्यानंतर सुरुवातीलाच विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात वाद झाला. विराट कोहलीने बेअरस्टोला क्रिझमध्ये उभे राहण्याचा इशारा केला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. भारताचा माजी कर्णधार हातवारे करताना दिसला होता. त्यानंतर त्याने बेअरस्टोला गप्प राहण्याचाही इशारा केला होता.

या वादानंतर जॉनी बेअरस्टोने शतक झळकावले. त्यावेळी विराटने खिलाडू वृत्ती दाखवत टाळ्या वाजवून त्याचे कौतुकही केली. याचे फोटो एकत्र करून ईसीबीने आपल्या अधिकृत ट्वीट हँन्डलवर एका इमोजी कॅप्शनसह विराटची खिल्ली उडवणारे ट्वीट केले.

ईसीबीने विराट आणि बेअरस्टोच्या वादातील विराटचा तोंडावर बोट असलेला एक फोटो आणि विराट बेअरस्टोसाठी टाळ्या वाजवत असल्याचा एक फोटो एकत्र करून ट्वीटवर पोस्ट केला. त्यासोबत तोंडाला चैन लावल्याचा इमोजीही कॅप्शन म्हणून टाकला. ईसीबीचे हे ट्वीट बघून भारतीय चाहत्यांना संताप अनावर झाला. अनेक चाहत्यांनी ट्वीटरवर ईसीबीवर टीका केली आहे.

हेही वाचा – विश्लेषण: ‘बेझबॉल’ धोरण म्हणजे काय?; तीन दिवस पराभवच्या छायेत असणाऱ्या इंग्लंडने सामना जिंकलाच कसा?

एका क्रिकेट बोर्डाने दिग्गज खेळाडूची अशा प्रकारे टिंगल करणे चूकीचे असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. भारताने आतापर्यंत इंग्लंडच्या खेळाडूंनी कधीही अशी वागणूक दिलेली नाही, असेही चाहत्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

Story img Loader