फॉम्र्युला-वनमध्ये निधी कपात धोरण सादर करण्यात आले नाही तर या खेळावर आर्थिक संकट ओढवेल. लवकरच ठोस निर्णय घेण्यात आले नाहीत, तर अनेक संघांना फॉम्र्युला-वनमधून माघार घ्यावी लागेल, असा इशारा विल्यम्स संघाच्या सहमालक क्लेअर विल्यम्स यांनी दिला आहे.
स्पॅनिश ग्रां. प्रि.साठीच्या पात्रता शर्यतीआधी बोलताना विल्यम्स म्हणाल्या की, ‘‘एक स्वतंत्र संघ या नात्याने फॉम्र्युला-वनमध्ये निधी कपात असावी, असे आम्हाला कायम वाटत होते. मात्र याबाबत बऱ्याच वर्षांपासून फक्त बोलणी सुरू आहेत. त्यामुळे आम्ही निराश झालो आहोत. यामुळे बरेचसे संघ बाहेर पडण्याची भीती असून त्याचा परिणाम खेळावर होऊ शकतो. खेळ कायम राहणे महत्त्वाचे आहे तसेच संघ असणेही तितकेच महत्त्वाचे आहे. लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेण्यात यावेत, अन्यथा फॉम्र्युला-वन खेळाला मोठा फटका बसू शकतो.’’
फॉम्र्युला-वनमधील स्वत: कार न बनवणाऱ्या संघांकडून (कस्टमर टीम) मानधन मिळण्यात विलंब होत असल्यामुळे या खेळातील सहभाग कायम ठेवण्यात अनेक अडचणी येत आहेत, असा इशारा बऱ्याच संघांना इंजिन पुरविणाऱ्या रेनॉ कंपनीने दिला होता. रेनॉचे फॉम्र्युला-वनमधील अध्यक्ष म्हणाले की, ‘‘अनेक संघांकडून उशिराने मानधन मिळत आहे. त्यामुळे या खेळात स्वत:चा पैसा टाकणे आता अशक्य होऊ लागले आहे. परिस्थिती गंभीर बनत चालली असून यावर काही आठवडय़ात तोडगा निघायलाच हवा. आता संघांसोबत चर्चा करूनच आम्ही योग्य तो निर्णय घेणार आहोत.’’

हॅमिल्टनला अव्वल स्थान
बार्सिलोना : स्पॅनिश ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यतीमध्ये मर्सिडिझचा ड्रायव्हर लुइस हॅमिल्टनने सर्वात वेगवान लॅप नोंदवत या मोसमातील चौथी पोल पोझिशन मिळवली आहे. रविवारी होणाऱ्या स्पॅनिश ग्रां. प्रि. मुख्य शर्यतीला तो पहिल्या क्रमांकावरून सुरुवात करेल. त्याचा सहकारी निको रोसबर्ग दुसऱ्या क्रमांकावर असेल. रेड बुलच्या डॅनियल रिकार्डियोने पात्रता शर्यतीत तिसरे तर विल्यम्सच्या वालटेरी बोट्टास याने चौथे स्थान प्राप्त केले. लोटसचा रोमेन ग्रॉसजेन पाचवा आला.

वजन कमी करण्यासाठी दोन दिवस सुटीलचा अन्नत्याग
बार्सिलोना : फॉम्र्युला-वन शर्यतीत सहभागी होता यावे, यासाठी आपले वजन कमी करण्याकरिता सौबेर संघाचा ड्रायव्हर एड्रियन सुटीलने चक्क दोन दिवस अन्नत्याग केला. फक्त पाणी पिऊन त्याने वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. वजन तपासणीवेळी इंधनाशिवाय कार आणि ड्रायव्हरचे वजन कमीत कमी ६९१ किलो असावे, असा नियम आहे. सुटीलचे वजन ७५ किलो असल्यामुळे त्याला योग्य समतोल राखण्यासाठी २० किलो वजन कमी करावे लागणार होते. ‘‘दोन दिवस अन्नग्रहण न करणे खरोखरच कठीण होते. माझी कसोटी लागत होती,’’ असे सुटीलने सांगितले.