कॅलिफोर्निया : उत्तरार्धात जॉण्डर कॅडिज आणि एडुआर्ड बेलो यांनी दहा मिनिटांच्या अंतराने केलेल्या दोन गोलच्या जोरावर व्हेनेझुएलाने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत दमदार विजयी सलामी दिली. व्हेनेझुएलाने इक्वेडोरला २-१ असा पराभवाचा धक्का दिला.
इक्वेडोरला बहुतेक सामना १० खेळाडूंसहच खेळावा लागला. कर्णधार एनर व्हॅलेन्सियाला २२व्या मिनिटाला पंचांनी लाल कार्ड दाखवून बाहेर काढले. मात्र, त्यानंतरही जेरेमी सारमिएंटोने गोल करून विश्रांतीला इक्वेडोरला आघाडीवर ठेवले होते.
हेही वाचा >>> बेल्जियमने विजयाचे खाते उघडले! रोमेनियावर मात; कर्णधार डीब्रूएनेची चमकदार कामगिरी
उत्तरार्धातही इक्वेडोर आपली ताकद ओळखून खेळत होते. त्यांनी सामन्यावर नियंत्रण राखले होते. गोल करण्याच्या संधी निर्माण करण्यात येणारे अपयश आणि त्या मिळाल्यावर गोल करण्यात आलेले अपयश अशा कात्रीत सापडलेल्या व्हेनेझुएलाच्या प्रशिक्षकांनी झटपट दोन बदल केले. हे बदल व्हेनेझुएलाच्या पथ्यावर पडले. दोन्ही राखीव खेळाडूंनी गोल करून व्हेनेझुएलाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. प्रथम ६४व्या मिनिटाला कॅडिजने पास आल्यावर क्षणाचीही उसंत न घेता १५ यार्डावरून चेंडूला गोलजाळीची दिशा देत व्हेनेझुएलाला बरोबरी साधून दिली. त्यानंतर ७४व्या मिनिटाला बेलोने गोल केला. यानंतर इक्वेडोर संघाला पुनरागमन करता आले नाही.
मेक्सिकोचा विजय
ह्युस्टन : मेक्सिकोने संघर्षपूर्ण लढतीत जमैकाचा १-० असा पराभव करून कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली. मात्र, सामन्यात कर्णधार एडसन अल्वारेझ जखमी झाल्याने मेक्सिकोसमोरील चिंता वाढल्या आहेत. जमैकाचा गोलरक्षक जमाली वेटने सामन्यात सहा गोल वाचवले. ६९व्या मिनिटाला जेरार्डो अर्टेगाने मेक्सिकोला आघाडीवर नेले. मेक्सिकोने आघाडी अखेरपर्यंत राखली.