अॅटलेटिको दी कोलकाता, चेन्नईयन एफसी आणि आता एफसी पुणे सिटी क्लबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोलरक्षक एडन बेटेला ऐतिहासिक ‘हॅट्ट्रिक’ खुणावत आहे. इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पध्रेच्या पहिल्या दोन सत्रात अनुक्रमे कोलकाता आणि चेन्नईयन क्लबकडून खेळताना बेटेने जेतेपदाची माळ गळ्यात घालून घेतली. १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आयएसएलच्या तिसऱ्या हंगामात बेटे पुणे क्लबचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे यंदाही बाजी मारून तीन विविध क्लबकडून खेळताना अजिंक्यपदाचा विक्रम करण्याची संधी बेटेकडे आहे.
आयएसएलच्या दोन हंगामात बेटेची कामगिरी उल्लेखनीय झाली आहे. त्याने एकूण २२ सामन्यांत प्रतिनिधित्व केले असून त्यात १० सामन्यांत एकही गोल न स्वीकारण्याचा पराक्रम केला आहे. प्रतिस्पर्धी संघाचे गोल करण्याचे ७५ प्रयत्न त्याने अपयशी ठरवले. त्यात दोन पेनल्टी स्पॉट किकचाही समावेश आहे. आयएसएलमधील यशस्वी गोलरक्षकांमध्ये बेटेचा समावेश आहे. गतवर्षी त्याला ‘गोल्डन ग्लोव्ह’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर पहिल्या हंगामात तो या शर्यतीत दुसऱ्या स्थानावर होता.
या अनोख्या विक्रमाबद्दल बेटेला विचारले असता तो म्हणाला की, ‘‘हा विक्रम करायला मला आवडेल. एफसी पुणे सिटीला यंदा नशिबाची साथ मिळेल अशी आशा आहे. नव्या आव्हानांना सामोरे जायला आवडते. कोलकाता व चेन्नईयन क्लबकडून खेळण्याचा अनुभव अविश्वसनीय होता. त्यानंतर मला नव्या आव्हानाची प्रतीक्षा होती आणि पुणेकडून खेळताना त्याची पूर्तता होईल.’’
पॅरिस सेंट जर्मेन या फ्रेंच क्लबसाठी खेळण्याचा अनुभव गाठीशी असलेल्या बेटेला करारबद्ध करण्यासाठी आयएसएलमधील क्लब्समध्ये चुरस रंगली. मात्र बेटेने पुणे सिटीकडून खेळण्याचा निर्णय घेतला. तो म्हणाला, ‘‘प्रशिक्षक अँटोनीओ हबास हे या निर्णयामागचे प्रमुख कारण आहे. पहिल्या हंगामात त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याचा अनुभव अप्रतिम होता. त्यांच्या कार्यपद्धतीचा माझ्यावर विलक्षण प्रभाव आहे. त्यामुळे त्यांचे आमंत्रण त्वरित स्वीकारले. क्लबशिवाय प्रशिक्षक कोण असेल याची कल्पना खेळाडूला असणे महत्त्वाचे असते. पुण्याच्या जोडीला हबास यांचे मार्गदर्शन मिळणार असल्यामुळे मला निर्णय घेणे सोपे गेले.’’