अ‍ॅथलेटिक्स हा केनियन खेळाडूंचा श्वास आहे. एडमंड ओगुटा यांनाही अ‍ॅथलेटिक्समध्ये कारकीर्द घडवायची होती. मात्र छोटय़ाशा अपघातामुळे त्याला आपल्या स्वप्नावर पाणी सोडावे लागले. अर्थात वैद्यकीय तज्ज्ञांनी त्याला कबड्डी खेळायला परवानगी दिली. त्यामुळे या खेळाकडे वळलेले एडमंड प्रो कबड्डी लीगच्या व्यासपीठावर तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

एडमंड हे केनियात पोलीस दलात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अन्य खेळाडूंप्रमाणेच त्यांनाही लहानपणापासून अ‍ॅथलेटिक्सची आवड होती. विशेषत: उंचीचा फायदा घेत उंच उडी, तिहेरी उडी किंवा लांब उडीत आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे त्यांचे ध्येय होते. परंतु एका छोटय़ाशा अपघातात त्यांच्या खांद्याला दुखापत झाली. ही जरी दुखापत छोटी असली तरी अ‍ॅथलेटिक्समध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर कारकीर्द घडवताना अडचण येऊ शकते, असे त्यांना वैद्यकीय तज्ज्ञांनी सल्ला दिला. त्या वेळी त्यांचे काही मित्र कबड्डीचा सराव करताना पाहून त्यांनी कबड्डीत भाग घेता येईल काय, असे विचारले असता वैद्यकीय तज्ज्ञांनी होकार दिला.

कबड्डीतील अनुभव कसा वाटला असे विचारले असता एडमंड म्हणाले, ‘‘जागतिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याची मला संधी मिळाली. अव्वल दर्जाचा चढाईपटू म्हणून माझ्यावर देशाची मदार होती. मी संघाला विजय मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केला. आमच्यासाठी हा खेळ अजूनही नवीनच आहे. अर्थात आमच्याकडे अ‍ॅथलेटिक्स, क्रिकेट, बॉक्सिंग आदी अन्य खेळांना लोकप्रियता लाभली आहे. कबड्डीत फारसे संघ नसल्यामुळे सरावाचीच समस्या असते.’’

तांत्रिक अधिकारी म्हणून काम करण्याचा निर्णय कसा घेतला, याबाबत ते म्हणाले, ‘‘मला कबड्डी हा खेळ खूप आवडतो. या खेळाशी खेळाडू म्हणून जवळीक ठेवणे तंदुरुस्तीच्या समस्येमुळे शक्य नव्हते. त्यामुळेच तांत्रिक अधिकारी किंवा पंच म्हणून काम करण्याची माझी इच्छा होती. सुदैवाने प्रो कबड्डीच्या संयोजकांनी मला त्याची संधी दिली. त्यामुळे मला खूप आनंद झाला. या स्पध्रेत मैदानावर साहाय्यक पंच म्हणून काम करताना अतिशय आनंद होतो.’’

अ‍ॅथलेटिक्समध्ये केनियाचे खेळाडू ऑलिम्पिक व जागतिक स्तरावर सातत्याने चमक दाखवत असतात. त्याबाबत रहस्यभेद करताना एडमंड म्हणाले, ‘‘साधारणपणे चौथ्या किंवा पाचव्या वर्षांपासूनच लहान मुलामुलींना अ‍ॅथलेटिक्सच्या सरावासाठी पाठवले जाते. १०व्या वर्षी त्याला परदेशातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये उतरवले जाते. आंतरराष्ट्रीय स्पर्धाचे वातावरण त्याला माहीत व्हावे, हाच त्यामागचा हेतू असतो. हा अनुभव पाहून त्याने साधारणपणे २०व्या वर्षी ऑलिम्पिक पदक जिंकावे अशीच प्रशिक्षकांची अपेक्षा असते. मॅरेथॉन व अन्य लांब अंतराच्या शर्यतीसाठी हेच नियोजन केले जाते. त्यामुळेच आमचे खेळाडू बोस्टन, लंडन, न्यूयॉर्क आदी ठिकाणी होणाऱ्या अव्वल दर्जाच्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यती गाजवत असतात.’’