वृत्तसंस्था, मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या आगामी हंगामात प्रभावी खेळाडू (इम्पॅक्ट प्लेअर) हा नियम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमाचा पहिला प्रयोग यंदाच्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धेत झाला होता. हा प्रयोग यशस्वी ठरला. त्यामुळे ‘आयपीएल’मध्येही हा नियम वापरला जाईल.
‘बीसीसीआय’ने ‘आयपीएल’ स्पर्धेत सहभागी दहाही संघांना पत्र पाठवून याबाबतची माहिती दिली. प्रभावी खेळाडू हा केवळ भारतीय असेल असे ‘बीसीसीआय’कडून सांगण्यात आले आहे. ‘आयपीएल’ संघांना एका सामन्यात चार परदेशी खेळाडू खेळवण्याची मुभा असते. परंतु सामन्याच्या सुरुवातीला संघात तीनच परदेशी खेळाडूंना स्थान दिल्यास प्रभावी खेळाडू म्हणून सामन्यादरम्यान चौथा परदेशी खेळाडू मैदानावर आणण्याची संघाला परवानगी असेल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत परदेशी खेळाडूंचा आकडा चारपेक्षा अधिक होऊ शकत नाही, असे ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केले आहे.
कर्णधाराला प्रभावी खेळाडूचे नाव सांगावे लागेल. डावाच्या सुरुवातीला, षटकाच्या समाप्तीनंतर, फलंदाज बाद झाल्यास किंवा फलंदाजाला दुखापतीमुळे बाहेर जावे लागल्यास प्रभावी खेळाडूला मैदानावर येता येईल. प्रभावी खेळाडू उर्वरित पूर्ण सामना खेळेल आणि तो ज्या खेळाडूची जागा घेईल, त्या खेळाडूला पुन्हा सामन्यात भाग घेता येणार नाही. तसेच प्रभावी खेळाडू कर्णधारपदही भूषवू शकणार नसल्याचे ‘बीसीसीआय’ने म्हटले आहे.