ख्रिस्तियानो रोनाल्डो या सात अक्षरांमध्ये फुटबॉल विश्वातला सध्याचा चमचमता तारा सामावला आहे. रिअल माद्रिद क्लबसाठी आणि पोर्तुगालसाठी दिमाखदार कामगिरी करणाऱ्या रोनाल्डोने वर्षांतील सर्वोत्तम फुटबॉलपटूच्या बलून डी’ओर पुरस्कारावर नाव कोरले. त्याची गोल करण्याची क्षमता अद्भुत अशी आहे. प्रतिस्पर्धी संघाने अभेद्य बचाव केलेला असताना, चेंडूचे नियंत्रण समोरच्या संघाकडे असतानाही रोनाल्डो चेंडूवर ताबा मिळवतो आणि गोल करतो, हे कोडे अनेक संघांना उलगडलेले नाही. प्रतिस्पध्र्याच्या तोंडातून विजयाचा घास हिरावण्याचे काम रोनाल्डो नित्यनेमाने करीत आहे. जगभरातल्या प्रशिक्षकांनी यासाठी वेगवेगळे डावपेच राबवून पाहिले. मात्र सरशी रोनाल्डोचीच होताना दिसते आहे. त्याच्या या अद्भुततेचे रहस्य उकलण्यासाठी आता थेट शास्त्रज्ञांनाच साकडे घालण्यात आले आहे. यानुसार त्याच्या शरीराचा, मेंदूचा, त्याच्या विचारयंत्रणेचा तपशीलवार अभ्यास केला जाणार आहे. असा हा रोनाल्डो पोर्तुगालच्या ताफ्यात आहे. परंतु रोनाल्डोची कामगिरी खालावत चालली आहे, ही पोर्तुगालसाठी चिंतेची बाब आहे. मात्र त्याच्या या अधोगतीसाठी तो स्वत:च आहे.
फुटबॉलसाठी मूलभूत गोष्ट म्हणजे खेळाडूची तंदुरुस्ती. रोनाल्डोने स्वत: किंवा संघव्यवस्थापनाने कितीही दावे केले तरी तो शंभर टक्के तंदुरुस्त नाही. त्याच्या गुडघ्याला सतत असलेली पट्टी याचे द्योतक आहे. रोनाल्डोला विश्रांती देण्याचा निर्णय पोर्तुगालचा संघ घेऊ शकतो. मात्र पोर्तुगालच्या संघात रोनाल्डो नाही म्हटल्यावर प्रतिस्पर्धी संघाला मोकळे रान मिळाल्यासारखे आहे. त्यामुळे प्रतिस्पध्र्यावर नैतिक दबाव राहावा, यासाठी रोनाल्डोला संघात समाविष्ट करण्याचा धोका पोर्तुगालच्या संघाने स्वीकारला आहे. मात्र दुखापतीतून पूर्णपणे न सावरल्याने रोनाल्डो नैसर्गिक खेळ करू शकत नाही. तो कदाचित ९० मिनिटे खेळपट्टीवर असेलही, मात्र त्याचे नुसते असणे उपयोगाचे नाही. अर्धवट तंदुरुस्ती असलेल्या खेळाडूपेक्षा एखाद्या नव्या दमाच्या खेळाडूला संधी देता आली असती, परंतु पोर्तुगाल संघाने याबाबतीत रोनाल्डोपुढे नमते घेतले आहे.
आधुनिक काळातला सर्वोत्तम खेळाडू कोण? लिओनेल मेस्सी की ख्रिस्तियानो रोनाल्डो, या प्रश्नावर विविध व्यासपीठांवर तावातावाने चर्चा रंगते. मेस्सी बार्सिलोनासाठी तर रोनाल्डो रिअल माद्रिदसाठी अफलातून खेळ करीत आहेत. दोघांचेही कौशल्य वादातीत आहे. दोघांभोवती मोठा आर्थिक डोलारा अवलंबून आहे. त्यांनी केलेला प्रत्येक गोल लाखोंचा फायदा करून देत आहे. मात्र त्यांचे अपयश आणि सर्वश्रेष्ठतेचे दावे आता दुसरीकडे सरकताना दिसत आहेत. २०१०च्या विश्वचषकातही रोनाल्डो पोर्तुगालसाठी लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकला नाही. यंदा सुसाट फॉर्ममध्ये असलेल्या रोनाल्डोला या वेळी काही तरी चमकदार करण्याची संधी आहे. मात्र फुटबॉल सांघिक खेळ आहे, याचा विसर रोनाल्डोला पडल्याचे जाणवत आहे. त्यातच मेस्सीने इराणविरुद्ध अविश्वसनीय गोल करीत श्रेष्ठत्व सिद्ध केल्याने या दोघांमधील चुरस पुन्हा ताणली गेली आहे. मेस्सीप्रमाणेच काही तरी चमत्कार करण्याचा रोनाल्डोचा प्रयत्न दिसतो आहे. मात्र या प्रक्रियेत संघसहकाऱ्यांना सामील करून घेण्यात तो अपयशी ठरला आहे. पोर्तुगाल म्हणजे रोनाल्डो असे चित्र असल्याने प्रसिद्धीचा झोत कायम रोनाल्डोवर राहिला आहे. अमेरिकेविरुद्धच्या लढतीत नानीने सातत्याने चांगला खेळ केला. याआधीही त्याने संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली आहे. मात्र रोनाल्डोपुराणामुळे नानीचे कर्तृत्व समोर येतच नाही. रोनाल्डोला स्वत:ला गोल करायचा असल्याने अनेकदा चेंडू पास करीतच नाही. गोल होण्यासाठी योग्य ठिकाणाहून प्रयत्न होणे आवश्यक असते आणि प्रत्येक वेळी रोनाल्डो योग्य ठिकाणी असेलच याची शाश्वती नसते. परंतु रोनाल्डो मात्र स्वत:वरच दडपण आणत मोठेपणा सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असतो, मात्र यात नुकसान पोर्तुगालचे होते.
पुढील विश्वचषकापर्यंत बऱ्याच गोष्टी बदलू शकतात. रोनाल्डो पुढच्या विश्वचषकापर्यंत तंदुरुस्त असेल का? तो संघात असेल का? पोर्तुगाल पात्रता फेरीचा अडथळा पार करेल का? अशा अनेक गोष्टी आहेत. या जर-तरवर विसंबून राहण्यापेक्षा आता मिळालेल्या संधीचा उपयोग करण्याची गरज आहे. रोनाल्डोपल्याडचा विचार करून पोर्तुगाल संघव्यवस्थापनाला सर्वसमावेशक संघ बांधावा लागणार आहे.
अन्य लढतीत वेगवान आणि आक्रमक फुटबॉल हे सूत्र अंगीकारत अल्जेरियाने दक्षिण कोरियाला निरुत्तर केले. नैसर्गिकदृष्टय़ा चपळ आणि वेगवान असणाऱ्या क्षमतेला कौशल्याची जोड अल्जेरियाने खेळ केला. दक्षिण कोरियाच्या बचावाला स्थिरावण्याची संधीच त्यांनी दिली नाही. आशियाई पातळीवरचा सगळ्यात चांगला संघ म्हणून दक्षिण कोरियाचा संघ ओळखला जातो. मात्र त्यांच्या खेळाडूंना इंग्लिश प्रीमिअर लीग, ला लिगा स्पर्धेत खेळण्याची संधी मिळत नाही. मोठय़ा खेळाडूंसोबत खेळण्याची, दडपणाची, व्यावसायिक डावपेचांमध्ये ते पिछाडीवर राहतात. आशियाई संघांनी सातत्याने खेळणे आवश्यक असते. मात्र हा सरावच त्यांना मिळत नाही. विश्वचषकासारख्या मोठय़ा स्पर्धेत या गोष्टी प्रकर्षांने जाणवतात. त्यांनाही क्लबचे प्रतिनिधित्व करायची संधी मिळाल्यास ते नक्कीच मोठी झेप घेऊ शकतात.

Story img Loader