अनेक नामवंत परदेशी खेळाडूंचा सहभाग असलेली प्रो टेबल टेनिस लीग मे व जून महिन्यांत आयोजित केली जाणार असून त्यासाठी आठ फ्रँचाईजींची निवड करण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया पुढील महिन्यात सुरू होईल, अशी माहिती भारतीय टेबल टेनिस महासंघाचे सरचिटणीस धनराज चौधरी यांनी दिली.

या स्पर्धेकरिता आठ संघांची निवड करण्यात येणार असली तरी सामने सहा शहरांमध्ये घेतले जाणार आहेत. या लीगसाठी मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई ही ठिकाणे निश्चित केली आहेत. बंगळुरू, जयपूर व लखनौ यांच्यापैकी एका शहराची लवकरच निवड केली जाईल. प्रत्येक संघात दोन परदेशी खेळाडूंसह सहा खेळाडूंचा समावेश राहणार आहे. आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाच्या मान्यतेनेच ही लीग होत असल्यामुळे चीन, जपान, दक्षिण कोरिया, चीन तैपेई, हाँगकाँग व सिंगापूर या देशांमधील अव्वल दर्जाच्या खेळाडूंना निमंत्रित केले जाणार आहे. ही स्पर्धा दोन आठवडे चालणार आहे.

‘‘भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक भवानी मुखर्जी हे लवकरच निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी काम करण्यासाठी भारतीय प्रशिक्षकांनी फारशी उत्सुकता दाखविली नाही. त्यामुळे आम्ही उत्तर कोरियातील अनुभवी प्रशिक्षकांची नियुक्ती करणार आहोत,’’ असेही चौधरी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘‘गांधीनगर येथील अकादमीसाठी गुजरात संघटनेने रिहोयांग इली या उत्तर कोरियन प्रशिक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला खेळाडूंनी राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत लक्षणीय कामगिरी केली आहे. त्यामुळेच आम्ही उत्तर कोरियन मार्गदर्शकांना प्राधान्य देत आहोत.’’

ऑलिम्पिकसाठी संभाव्य खेळाडूंची निवड केव्हा करणार, या प्रश्नाला उत्तर देताना चौधरी म्हणाले, ‘‘जानेवारीत वरिष्ठ गटाची राष्ट्रीय स्पर्धा होणार आहे. त्यानंतर भारताच्या संभाव्य खेळाडूंची निवड केली जाईल. या खेळाडूंची ऑलिम्पिकपूर्व पात्रता स्पर्धेत चांगली कामगिरी व्हावी या दृष्टीने संभाव्य खेळाडूंना परदेशात प्रशिक्षण व स्पर्धात्मक सरावाकरिता संधी दिली जाणार आहे. त्यांना केंद्र शासन व आमच्या महासंघातर्फे आर्थिक साहाय्य केले जाईल.’’

Story img Loader