या कसोटीतील ऑस्ट्रेलियाच्या संघातील आठ खेळाडू कदाचित पुन्हा ऑस्ट्रेलियासाठी कसोटी खेळणार नाही, असे परखड मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने सांगितले. ‘‘आठ हा खूप मोठा आकडा आहे. खेळात नक्की कुठे आणि काय चुका झाल्या याचा साकल्याने विचार करावाच लागेल. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाडय़ांवर सुमार कामगिरी झाल्याने मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले,’’ असे पॉन्टिंगने सांगितले. सलामीवीर ख्रिस रॉजर्स, यष्टिरक्षक फलंदाज ब्रॅड हॅडीन आणि कर्णधार मायकेल क्लार्क अ‍ॅशेस मालिकेनंतर निवृत्त होत आहेत. अ‍ॅडम व्होग्स अ‍ॅशेस मालिकेत सपशेल अपयशी ठरला. त्यामुळे त्याला डच्चू मिळण्याची शक्यता आहे. सातत्याने होणाऱ्या दुखापती आणि असातत्य यामुळे शॉन मार्शला ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळणे कठीण आहे. दुखापती, खराब फॉर्म आणि वाढते वय यामुळे शेन वॉटसन कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे. ३० वर्षीय पीटर सिडलला मालिकेत आतापर्यंत एकही संधी मिळालेली नाही. मात्र फॉर्ममधील घसरणीमुळे त्यालाही संघातून वगळले जाण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eight of this side might never play another test says ponting