अद्भुत टेनिसची पर्वणी ठरलेल्या आणि मानवी प्रयत्नांची परिसीमा पाहणाऱ्या विम्बल्डनच्या पुरुष एकेरीच्या मुकाबल्यात नोव्हाक जोकोव्हिचने झुंजार खेळ करून विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरले. मॅचपॉइंट वाचवून जोकोव्हिचला पाचव्या सेटपर्यंत झुंजवणाऱ्या फेडररचा झंझावात अखेर जोकोव्हिचने रोखत कारकिर्दीतील सातव्या तर विम्बल्डनच्या दुसऱ्या जेतेपदाची कमाई केली. उत्कंठावर्धक रंगलेल्या या मुकाबल्यात जोकोव्हिचने ६-७ (९), ६-४, ७-६ (४), ५-७, ६-४ अशी बाजी मारली.
विजेता कोण, दोन पिढीतील अव्वल खेळाडूंमध्ये रंगलेल्या या मुकाबल्यात श्रेष्ठ दर्जाचे टेनिस अनुभवायला मिळाल्याच्या आनंदात टेनिसरसिक न्हाऊन निघाले. या जेतेपदासह जोकोव्हिचने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. कारकिर्दीतील विक्रमी अठरावे तर विम्बल्डनचे आठवे जेतेपद पटकावण्याच्या उद्देशाने खेळणाऱ्या फेडररने पहिला सेट टायब्रेकरमध्ये जिंकत आश्वासक सुरुवात केली. एक हाती बॅकहँड, बिनतोड सव्र्हिस आणि शैलीदार खेळासमोर नामोहरम झालेल्या जोकोव्हिचने दुसऱ्या सेटमध्ये चिवट खेळ करत प्रत्युत्तर दिले. १-१ बरोबरीने आत्मविश्वास उंचावलेल्या जोकोव्हिचने तिसरा सेट नावावर करत जेतेपदाची पायाभरणी केली.
आव्हान जिवंत राखण्यासाठी चौथा सेट जिंकणे अनिवार्य झालेल्या फेडररने सगळा अनुभव पणाला लावत जोकोव्हिचला निष्प्रभ ठरवले. जोकोव्हिचची मॅचपॉइंटची संधी हिरावून घेत फेडररने चौथा सेट जिंकला. दुखापतीने सतावलेल्या मात्र चिवट वृत्तीसाठी ओळखल्या जाणाऱ्या जोकोव्हिचने सेंटर कोर्टवर फेडररला मिळणाऱ्या प्रचंड पाठिंब्याचे दडपण न घेता सर्वोत्तम खेळ करत पाचव्या सेटसह सामना जिंकला.
रॉजर फेडररचे मी अभिनंदन करतो. अविस्मरणीय अशा मुकाबल्याचा मला साक्षीदार होता आले. फेडरर हा महान खेळाडू तसेच सार्वकालिन श्रेष्ठ क्रीडापटू आणि आदर्श खेळाडू आहे. टेनिसला दिलेल्या अतुलनीय योगदानासाठी मला त्याचा आदर वाटतो. मला जिंकू दिल्याबद्दल त्याचे मनापासून आभार. हे जेतेपद माझी पत्नी आणि होणाऱ्या बाळाला समर्पित करतो. माझ्या यशात प्रशिक्षकांची भूमिका निर्णायक आहे. माझे सध्याचे प्रशिक्षक बोरिस बेकर यांचे मनापासून आभार. त्यांच्या प्रयत्नांचे हे फळ आहे.
नोव्हाक जोकोव्हिच
संग्रहित लेख, दिनांक 7th Jul 2014 रोजी प्रकाशित
ग्रँड स्लॅमची सप्तपदी!
अद्भुत टेनिसची पर्वणी ठरलेल्या आणि मानवी प्रयत्नांची परिसीमा पाहणाऱ्या विम्बल्डनच्या पुरुष एकेरीच्या मुकाबल्यात नोव्हाक जोकोव्हिचने झुंजार खेळ करून विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरले.

First published on: 07-07-2014 at 01:52 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eight will have to wait