‘‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदार्पणातच सोनेरी कामगिरी करण्याचे माझे स्वप्न होते. हे स्वप्न साकार झाल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे,’’ असे एकता शिर्केने सांगितले.
एकता ही मूळची वाईजवळील पसरणी येथील रहिवासी आहे. तिचे वडील शेतकरी असून ती सध्या पुण्यातील शाहू महाविद्यालयात शिकत आहे. तिने आतापर्यंत नवी दिल्ली येथे झालेल्या खुल्या अखिल भारतीय स्पर्धेत एक सुवर्णपदक मिळविले होते. तसेच तिने राज्य स्तरावरील अनेक स्पर्धामध्ये भरघोस पदकांची कमाई केली आहे. राष्ट्रीय स्पर्धेत तिने पदार्पणातच सुवर्णपदक मिळवित ऐतिहासिक कामगिरी केली.
या कामगिरीविषयी एकता म्हणाली, ‘‘शाळेत असताना मी वाई येथे काही खेळाडूंना तिरंदाजीचा सराव करीत असताना पाहिले होते. आपणही या खेळात भाग घ्यावा अशी मला इच्छा झाली. पालकांनी या खेळात भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. सुरुवातीला प्रणित सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली मी सराव सुरू केला. किसनवीर महाविद्यालय व त्यानंतर शाहू महाविद्यालयात शिकत असताना विद्यापीठ स्तरावरही मला अनेक पदके मिळाल्यानंतर याच खेळांत कारकीर्द करण्याचा मी निर्णय घेतला. पुण्यात सध्या मी रणजित चामले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.’’

Story img Loader