महाराष्ट्राच्या एकता शिर्केने एक सुवर्ण व एक कांस्यपदक मिळवत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तिरंदाजीत कौतुकास्पद कामगिरी केली. जलतरणात महाराष्ट्राच्या वीरधवल खाडे, मोनिक गांधी व आदिती घुमटकर यांनी रौप्यपदकांची कमाई केली. सायकलिंगमध्ये अरविंद पन्वर या महाराष्ट्राच्या खेळाडूला रुपेरी यश मिळाले. एकताने तिरंदाजीतील इंडियन राउंड प्रकारात पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. तसेच तिने रूपाली यमगर, स्नेहल मांढरे व दिशा रोडे यांच्या साथीने महाराष्ट्राला सांघिक विभागात कांस्यपदक मिळवून दिले. कांस्यपदकाच्या लढतीत महाराष्ट्राने मणिपूर संघावर २०२-१९५ अशी मात केली.
जलतरणात सुवर्णपदक हुकले
जलतरणात महाराष्ट्राच्या सोनेरी यशाची मालिका खंडित झाली. १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक शर्यतीत मोनिक गांधीला रौप्यपदक मिळाले. ही शर्यत तिने एक मिनिट १७.८७ सेकंदांत पार केली. चंडीगढच्या चाहत अरोराला (एक मिनिट १७.४८ सेकंद) सुवर्णपदक मिळाले. १०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीतही आदिती घुमटकर ही सोनेरी यशापासून वंचित राहिली. तिने हे अंतर ५९.३४ सेकंदांत पार करत रौप्यपदक जिंकले. हरयाणाच्या शिवानी कटारियाने (५८.३४ सेकंद) सुवर्णपदक पटकावले. पुरुष गटातील १०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत विजेतेपदाचा दावेदार असलेल्या वीरधवलला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ही शर्यत त्याने ५१.१० सेकंदांत पार केली.महाराष्ट्राने जलतरणात आतापर्यंत ११ सुवर्ण, १६ रौप्य व ५ कांस्य अशी एकूण ३२ पदके मिळविली आहेत.
सायकलिंगमध्ये अरविंदला रौप्य
अरविंद पन्वरने सायकलिंगमधील पुरुषांच्या टाइमट्रायल विभागात रौप्यपदक मिळविले. त्याने ३६ किमी अंतर ५० मिनिटे २८.३०३ सेकंदांत पार केले. नेमबाजीत शिवराजला कांस्य
नेमबाजीत महाराष्ट्राच्या शिवराज ससेला २५ मीटर रॅपीड फायर पिस्तूल विभागात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने १९ गुण नोंदवले. विजय कुमार (सेनादल) व हरप्रीत सिंग (हरयाणा) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक मिळविले. महाराष्ट्राचा खेळाडू रौनक पंडित याची पत्नी हिना सिद्धू हिने पंजाबकडून प्रतिनिधित्व करताना १० मीटर पिस्तूल विभागात सोनेरी कामगिरी केली. तिने २००.८ गुण नोंदवले.
प्रार्थना ठोंबरे अंतिम फेरीत
महाराष्ट्राच्या प्रार्थना ठोंबरेने टेनिसमधील महिलांच्या एकेरीत अंतिम फेरी गाठली. तिने उपांत्य फेरीत स्नेहदेवी रेड्डीवर ४-६, ७-५, ६-० असा पराभव केला. दुहेरीत मात्र तिला उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला. अंकिता रैना व इती मेहता यांनी प्रार्थना व रश्मी तेलतुंबडे यांना ५-७, ६-४, १०-६ असे हरविले. पुरुष दुहेरीत महाराष्ट्राच्या नितीन कीर्तने व अन्वित बेंद्रे यांनाही उपांत्य फेरीत हार मानावी लागली. साकेत मायनेनी व विष्णु वर्धन (तेलंगणा) यांनी त्यांचा ६-०, ७-५ असा पराभव केला. महाराष्ट्राच्या दोन्ही जोडय़ांना कांस्यपदक मिळाले.

Story img Loader