भारतीय महिला क्रिकेटपटू एकता बिष्टने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. महिला सीनियर टी-२० चॅम्पियनशिपमध्ये तिने अप्रतिम कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शुक्रवार (२० ऑक्टोबर) उत्तराखंडकडून खेळताना, एकताने झारखंडविरुद्ध केवळ आठ धावा देत चार षटकांत सात बळी टिपले. त्यात हॅट्ट्रिकचाही समावेश आहे. यासोबतच एकताने एक विक्रमही आपल्या नावावर केला आहे. महिला वरिष्ठ टी-२० चॅम्पियनशिपमध्ये एकाही गोलंदाजाने इतक्या कमी धावा देऊन इतक्या विकेट्स घेतल्या नाहीत.
एकताच्या शानदार गोलंदाजीमुळे उत्तराखंडने झारखंडचा १० धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना उत्तराखंडने २० षटकांत ६ गडी गमावून १०७ धावा केल्या. प्रत्युत्तरात झारखंडचा संघ ९७ धावांत गारद झाला. एकताला तिच्या शानदार कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. एकताने १९व्या षटकात हॅट्ट्रिक नोंदवताना देवयानी, पूनम राऊत आणि प्राजक्ता यांना सलग तीन चेंडूंवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. १९व्या षटकात तिने खात्यात एकूण चार बळी घेतले.
एकता सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. तिने भारतासाठी आतापर्यंत ६३ एकदिवसीय, ४२ टी-२० आणि एक कसोटी खेळला आहे. एकताने वनडेमध्ये ९८, टी-२० मध्ये ५३ आणि कसोटीत तीन बळी घेतले आहेत. एकता २०१७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या मिताली राजच्या संघाचा भाग होती. भारतीय संघात सध्या दीप्ती शर्मा, स्नेह राणा, हेमलता, राजेश्वरी गायकवाड आणि राधा यादव या फिरकीपटूंचा समावेश आहे. अशा स्थितीत एकताची ही कामगिरी तिला टीम इंडियाचा प्रबळ दावेदार बनवत आहे.
एकताच्या नावावर अनेक विक्रम –
एकताच्या नावावर आणखी अनेक विक्रम आहेत. टी-२० विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारी ती पहिली भारतीय महिला गोलंदाज आहे. एकदिवसीय विश्वचषक पात्रता फेरीत आणि एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत, पाकिस्तानविरुद्ध प्रत्येकी पाच बळी घेणारी ती एकमेव महिला गोलंदाज आहे. जून २०११ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकताने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो टी-२० सामना होता. त्यानंतर त्याने जुलै २०११ मध्ये एकदिवसीय आणि २०१४ मध्ये कसोटी पदार्पण केले.