ऑस्ट्रेलियाची आधारस्तंभ आणि महान अष्टपैलू खेळाडू एलिसा पेरीने वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेत विकेट्सचा षटकार लगावला. दिल्लीच्या अरुण जेटली आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर तुल्यबळ मुंबई इंडियन्सविरुद्ध पेरीने एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल सहा विकेट्स पटकावल्या. वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेतली ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. पेरीने ४ षटकात अवघ्या १५ धावांच्या मोबदल्यात ६ विकेट्स घेतल्या. पेरीच्या झंझावातासमोर मुंबई इंडियन्सचा डाव ११३ धावांतच आटोपला. मुंबई इंडियन्सचा संघ बाद फेरीसाठी पात्र ठरला आहे. बंगळुरूचं बाद फेरीतलं स्थान जवळपास पक्कं आहे. हा सामना जिंकून बाद फेरीत अधिकृतपणे प्रवेश करण्यासाठी बंगळुरूचा संघ आतूर आहे.
हायले मॅथ्यूज आणि सजीवन साजना यांनी ४३ धावांची खणखणीत सलामी दिली. सोफी डिव्हाइनने मॅथ्यूजला बाद करत ही जोडी फोडली. तिने २६ धावा केल्या. एलिसा पेरीने साजनला त्रिफळाचीत केलं. तिने ५ चौकार आणि एका षटकारासह २१ चेंडूत ३० धावा केल्या. मुंबईचा आधारस्तंभ आणि भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला पेरीनेच त्रिफळाचीत केलं. तिला भोपळाही फोडता आला नाही. अमेलिआ केरचा बचावही पेरीसमोर अपुरा ठरला. तिला पेरीने पायचीत केलं. अमनजोत कौरही पेरीच्याच गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतली. पूजा वस्राकरला बाद करत पेरीने पाचव्या विकेटची नोंद केली. भरवशाच्या नताली शिव्हर ब्रंटला परतीचा रस्ता दाखवत पेरीने सहावी विकेट नावावर केली. सोफी मोलिनक्स, सोफी डिव्हाईन, आशा शोभना आणि श्रेयांका पाटील यांनी प्रत्येकी एक विकेट घेत पेरीला चांगली साथ दिली. मुंबईकडून प्रियांका बालाने १९ धावा करत प्रतिकार केला.
वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेत मॅरिझान काप, आशा शोभना, तारा नॉरिस आणि किम गॅरथ यांनी डावात पाच विकेट्स घेण्याची करामत केली होती. पेरीने या सगळ्याजणींना मागे टाकत विकेट्सचा षटकार नोंदवत नवा विक्रम प्रस्थापित केला. १३ टेस्ट, १४४ वनडे आणि १५१ ट्वेन्टी२० लढतीत ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलेल्या पेरीच्या नावावर ६६६३ धावा तर ३२७ विकेट्स आहेत.