एलिसा पेरीच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेत मुंबई इंडियन्सला नमवत बाद फेरी गाठली. मुंबईसह बंगळुरू बाद फेरीत पोहोचले आहेत. बंगळुरूच्या विजयासह युपी वॉरियर्स संघाचं बाद फेरीचं स्वप्न विरलं आहे.
विजयासाठी मिळालेल्या ११४धावांच्या छोटेखानी लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार स्मृती मन्धाना आणि सोफी मोलिनक्स यांनी २२ धावांची सलामी दिली. सोफीला मॅथ्यूजने बाद केलं. तिने ९ धावा केल्या. पाठोपाठ स्मृतीही तंबूत परतली. तिने ११ धावा केल्या. शिव्हर ब्रंटने तिला बाद केलं. सोफी डेव्हाइन ४ धावा करुन माघारी परतली. पण यानंतर एलिसा पेरी आणि रिचा घोष यांनी चौथ्या विकेटसाठी ५३ चेंडूत ७६ धावांची भागीदारी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. पेरीने ३८ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४० धावा केल्या. रिचाने मागच्या सामन्यातली निराशा झटकून टाकत २८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ३६ धावांची खेळी केली. मुंबईकडून शबनम इस्माइल, मॅथ्यूज आणि नताली यांनी प्रत्येकी एक विकेट पटकावली.
तत्पूर्वी पेरीच्या सहा विकेट्सच्या बळावर बंगळुरूने मुंबईचा डाव ११४ धावांतच गुंडाळला. दिल्लीच्या अरुण जेटली आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर तुल्यबळ मुंबई इंडियन्सविरुद्ध पेरीने एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल सहा विकेट्स पटकावल्या. वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेतली ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. पेरीने ४ षटकात अवघ्या १५ धावांच्या मोबदल्यात ६ विकेट्स घेतल्या.
हायले मॅथ्यूज आणि सजीवन साजना यांनी ४३ धावांची खणखणीत सलामी दिली. सोफी डिव्हाइनने मॅथ्यूजला बाद करत ही जोडी फोडली. तिने २६ धावा केल्या. एलिसा पेरीने साजनला त्रिफळाचीत केलं. तिने ५ चौकार आणि एका षटकारासह २१ चेंडूत ३० धावा केल्या. मुंबईचा आधारस्तंभ आणि भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला पेरीनेच त्रिफळाचीत केलं. तिला भोपळाही फोडता आला नाही. अमेलिआ केरचा बचावही पेरीसमोर अपुरा ठरला. तिला पेरीने पायचीत केलं. अमनजोत कौरही पेरीच्याच गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतली. पूजा वस्राकरला बाद करत पेरीने पाचव्या विकेटची नोंद केली. भरवशाच्या नताली शिव्हर ब्रंटला परतीचा रस्ता दाखवत पेरीने सहावी विकेट नावावर केली.
वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेत मॅरिझान काप, आशा शोभना, तारा नॉरिस आणि किम गॅरथ यांनी डावात पाच विकेट्स घेण्याची करामत केली होती. पेरीने या सगळ्याजणींना मागे टाकत विकेट्सचा षटकार नोंदवत नवा विक्रम प्रस्थापित केला. १३ टेस्ट, १४४ वनडे आणि १५१ ट्वेन्टी२० लढतीत ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलेल्या पेरीच्या नावावर ६६६३ धावा तर ३२७ विकेट्स आहेत.