सध्या सुरू असलेल्या वुमन्स प्रीमिअर लीगमधल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाची स्फोटक फलंदाज एलिसा पेरी हिला मसाला चहाचं खूप वेड आहे.युपी वॉरियर्जविरूध्दच्या शानदार विजयानंतरच्या व्हीडिओमध्ये सांगितलं आहे. सोमवारी पेरीने लगावलेल्या एका षटकाराने मालिकावीराला बक्षीस म्हणून देण्यात येणाऱ्या गाडीची काचच तुटली. हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे.
यंदाच्या मोसमात मात्र आरसीबीचा संघ सुरूवातीपासूनच चांगल्या फॉर्मात आहे. स्मृती मंधानाच्या नेतृत्त्वाखालील या संघाने घरच्या मैदानावर युपी वॉरियर्जविरूध्द झालेल्या सामन्यात शानदार विजय मिळवला आहे. आरसीबीच्या संघातील ऑस्ट्रेलियाची शानदार फलंदाज एलिस पेरी ही संघाच्या मधल्या फळीतील महत्त्वाची खेळाडू आहे. एलिसा ही मैदानावरील तिच्या तडाखेबंद खेळीसाठी ओळखली जाते.
एलिसाने दिमाखदार खेळ करत संघाला शानदार विजय मिळवून दिला. पेरीने बेंगळुरूमधील चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या युपीविरूध्दच्या सामन्यात ३७ चेंडूंत ५८ धावा केल्या. तिच्या या खेळीनंतर संघाची कर्णधार स्मृतीने तिच्यासोबत संवाद साधला, ज्याचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या संवादादरम्यान एक वेगळीच माहिती मिळाली, ते म्हणजे एलिसा पेरी ही मसाला चहाची प्रचंड वेडी आहे. एलिसा ही दिवसभरात १२ कप मसाला चहा पिते आणि तेही एका तासाला एक कप चहा. स्मृतीबरोबरच्या व्हिडिओमध्ये पेरीने स्वत: याची कबुली दिली आहे. काही दिवसांपूर्वी स्मृतीने एलिसासोबत चहाचा कपसह एक सेल्फी पोस्ट केला आहे. जो खूपच व्हायरल झाला होता.
या व्हिडिओमध्ये पेरी स्मृतीला विचारले की, “मसाला चाय पिण्यासाठी कोणती वेळ सर्वोत्तम आहे”
तर यावर मंधाना म्हणाली, “तुझ्या वेळांनुसार तर नक्कीच नाही. तू तर कमीत कमी १२ कप मसाला चहा घेतेस. एका भारतीयासाठी सकाळी ९:३० आणि संध्याकाळी ४ वाजता २ कप पुरेसे आहेत, पण तू १२ कप चहा पितेस. जाहिरातींच्या शूटदरम्यान तुझे दिवसातून १० कप सहज होतात”.
षटकार आणि खळखट्याक
याचदरम्यान, पेरीने तिच्या मॅचविनिंग अर्धशतकामध्ये असा काही षटकार लगावला की तो थेट जाऊन कारच्या खिडकीच्या काचेवर जाऊन आदळला. मालिकावीर पुरस्कारार्थीला ही गाडी भेट म्हणून मिळणार आहे.
आरसीबीच्या डावाच्या १९व्या षटकाच्या अंतिम चेंडूवर, पेरीचा ८० मीटर लांब षटकार कारच्या खिडकीवर आदळला. पेरीच्या फटक्यामुळे गाडीची काच फुटली हे कळताच तिने डोक्याला हात लावला. ही प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली आहे आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
एलिसा पेरी आणि स्मृती मंधानाच्या शानदार खेळीच्या जोरावर आरसीबीने युपी वॉरियर्ज संघावर २३ धावांनी विजय मिळवत या हंगामातील तिसरा विजय नोंदवला. पेरीच्या आधी संघाची कर्णधार स्मृती मंधानाने ५० चेंडूंत ८० धावांची स्फोटक खेळी केली. या दोघींमुळे आरसीबी संघ १९८ धावांचा टप्पा गाठू शकला ही धावसंख्या आतापर्यंतच्या मोसमातील सर्वात मोठी धावसंख्या ठरली. आरसीबी संघाने शानदार विजयानंतर बेंगळुरूमधील चाहत्यांचे आभार मानले.