‘‘आयसीसीकडे भारताचे प्रतिनिधित्व मलाचकरता यावे,’’ अशी आडमुठी भूमिका घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी आपले हक्क सोडले खरे, पण २९ जूनला होणाऱ्या बैठकीसाठी जायचे की नाही, या संभ्रमात सध्या ते आहेत. आयसीसीच्या वार्षिक बैठकीला जायचे की नाही, हा निर्णय ते बैठकीची मुदत जवळ आल्यावर घेतील, असे सूत्रांनी सांगितले आहे.
आयपीएलमधील स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजीप्रकरणानंतर श्रीनिवासन यांच्यावर पदत्याग करण्याची मागणी जोर धरत होती. त्यांचा जावई गुरुनाथ मयप्पन सट्टेबाजीत सापडल्याने त्यांच्यावर अध्यक्षपद सोडण्याचा फास आणखीनच आवळला गेला होता. पण आपल्या भूमिकेवर ठाम राहत त्यांनी बीसीसीआयच्या बैठकीमध्ये आपले हक्क बहाल केले आणि हंगामी अध्यक्ष म्हणून निवडल्या गेलेल्या जगमोहन दालमिया यांना हे हक्क देण्यात आले. पण हक्क बहाल करण्यापूर्वी श्रीनिवासन यांनी काही अटी ठेवल्या होत्या. त्यामध्ये आयसीसीकडे भारताचे प्रतिनिधीत्व मला करायला मिळायला हवे, अशी त्यांची मागणी होती. पण हक्क बहाल केल्यानंतर हंगामी अध्यक्ष दालमिया यांनी आपण आयसीसीच्या बैठकीला जाणार असल्याचे सूतोवाच केले आणि पेच निर्माण झाला. यावर उपाय म्हणून श्रीनिवासन आणि दालमिया यांच्या वादात न पडता बीसीसीआयचे उपाध्यक्ष अरुण जेटली यांना आयसीसीच्या बैठकीला पाठवण्याचे पेव फुटले होते. पण काही दिवसांपूर्वीच श्रीनिवासन यांनी आपणच आयसीसीच्या बैठकीला जाणार असल्याचे सूतोवाच करत पुन्हा एकदा पेच निर्माण केला होता.
लंडनमधील आयसीसीच्या बैठकीला जायचे की नाही, हे श्रीनिवासन यांनी अजून ठरवलेले नाही. आयसीसीची बैठक २९ जूनला होणार असून ही तारीख जशी जवळ येईल, तसेच श्रीनिवासन आपला निर्णय घेतील, असे तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे सचिव काशी विश्वनाथन यांनी सांगितले आहे.
श्रीनिवासन यांची तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली असून त्यांची ८३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी ३० जूनला घेण्याचे ठरवण्यात आले आहे. पण जर श्रीनिवासन लंडनला बैठकीसाठी जाणार असतील तर ते आयसीसीच्या सहसमितीची बैठकीसह अर्थ आणि व्यावसायिक प्रशासनाच्या बैठकींना उपस्थित राहण्याची शक्यता आहे, तर हंगामी अध्यक्ष जगमोहन दालमिया आयसीसीच्या मंडळाच्या बैठकीला हजर राहतील. त्याचबरोबर बीसीसीआयचे सचिव संजय पटेल आयसीसीची मुख्य कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहतील, तर आयपीएलचे सीईओ सुदंर रमन आयसीसीच्या कार्यकारी गटाच्या बैठकीला हजर राहतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा