तुषार वैती
‘मुंबई-श्री’ स्पर्धेत माजी विजेत्यांनाही सहभागाची संधी
उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटूंनाही विजेतेपदाची संधी मिळावी, यासाठी गेल्या काही वर्षांपासून ‘मुंबई-श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्यांना पुन्हा या स्पर्धेत उतरण्याची संधी नसायची. मात्र कोणत्याही खेळाडूला कोणत्याही स्पर्धेत खेळण्यासाठी बंधने नसावीत, या राष्ट्रीय क्रीडा संहितेमधील नियमाची अंमलबजावणी या वर्षीपासून ‘मुंबई-श्री’ स्पर्धेत केली जाणार आहे. त्यामुळे गेले कित्येक महिने या स्पर्धेसाठी कसून तयारी करणाऱ्या आणि मुंबई-श्री किताबाचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या होतकरू खेळाडूंना या बदललेल्या नियमांचा फटका बसण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत श्याम रहाटेने तीन वेळा, अनिल राऊत, सागर कातुर्डे आणि शशिकांत वटकर यांनी प्रत्येकी दोन वेळा ‘मुंबई-श्री’ किताबावर नाव कोरले आहे. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विजेत्यांना मुंबई-श्रीचा किताब जिंकल्यानंतर पुन्हा सहभागी होता येणार नाही, असा नियम २०११ मध्ये करण्यात आला होता. त्यानंतर मात्र कोणत्याही खेळाडूला दोनवेळा मुंबई-श्री किताब जिंकता आलेला नाही.
महाराष्ट्र-श्री, भारत-श्री, आशिया-श्री या स्पर्धावर गेली पाच वर्षे मुंबईच्या सुनीत जाधवचा दबदबा राहिलेला आहे. सुनीतच्या बलदंड शरीरयष्टीपुढे देशातील एकही शरीरसौष्ठवपटू तग धरू शकत नाही. आता २०१४ नंतर सुनीतसाठी पुन्हा एकदा ‘मुंबई-श्री’ किताब पटकावण्यासाठीचे दरवाजे खुले झाले आहेत. मात्र सुनीत, सागर कातुर्डे, अतुल आंब्रे, सुजल पिळणकर यांसारखे महारथी उतरल्यानंतर आपला निभाव लागणार नाही, या भीतीपोटी युवा शरीरसौष्ठवपटूंच्या उत्साहावर विरजण पडणार आहे.
गेल्या काही वर्षांत ‘मुंबई-श्री’ने कात टाकली असून दरवर्षी नवनवीन विजेते समोर येत होते. मात्र आता नवीन आचारसंहितेनुसार बृहन्मुंबई शरीरसौष्ठव असोसिएशन आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव असोसिएशन यांनी संयुक्तपणे घेतलेल्या या निर्णयामुळे विजेतेपदासाठी उदयोन्मुख आणि अव्वल शरीरसौष्ठवपटू एकाच वेळी मैदानात उतरणार आहेत. या निर्णयामुळे स्पर्धेतील रंगत काहीशी नाहीशी होणार आणि युवा खेळाडूंची विजेतेपदाची संधी हिरावली जाणार, अशी भीती उदयोन्मुख शरीरसौष्ठवपटू व्यक्त करीत आहेत.
‘मुंबई-श्री’ किताब पटकावणारा खेळाडू देशभर लोकप्रिय होतो. त्यामुळे मी जर ‘मुंबई-श्री’ झालो नसतो तर या स्पर्धेत यंदा नक्कीच उतरलो असतो. पूर्वीच्या नियमामुळे मलाही ‘मुंबई-श्री’ होण्याची संधी मिळाली. माझ्या मते पूर्वीचेच नियम या स्पर्धेसाठी असावेत. पण आयोजकांनीही योग्य विचार करूनच हा निर्णय घेतला असेल. उदयोन्मुख खेळाडूंनी इतकी जबरदस्त तयारी करावी की तुमच्यासमोर नामांकित शरीरसौष्ठवपटूही फिके पडतील, असाच सल्ला मी देईन.
– सुनीत जाधव, आशिया-श्री
देशभरातील प्रतिष्ठेच्या स्पर्धा गाजवणारे मुंबईतील अव्वल खेळाडू उतरल्याने ‘मुंबई-श्री’तील स्पर्धा वाढत जाईल. त्याचबरोबर जुन्या खेळाडूंसह दोन हात करताना आपण कुठे कमी पडत आहोत, हे कळल्यानंतर होतकरू खेळाडूंना आपल्यात सुधारणा करता येईल. गेली ५-६ वर्षे आम्ही होतकरू खेळाडूंना वाव देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या अनुभवात वाढ व्हावी आणि नामांकित शरीरसौष्ठवपटूंकडून शिकता यावे, यासाठी हा बदल करण्यात आला आहे.
– राजेश सावंत, बृहन्मुंबई शरीरसौष्ठव असोसिएशनचे सरचिटणीस