वृत्तसंस्था, अहमदाबाद
क्रिकेटवेडय़ा भारतात तब्बल १२ वर्षांनी खेळवण्यात येत असलेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची सुरुवात, स्पर्धेच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेला मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर, गतविश्वचषकाचा अंतिम सामना रोमहर्षक करणारे इंग्लंड-न्यूझीलंड हे दोन संघ.. असा त्रिवेणी संगम साधणारी मैफल अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार असताना तिला दाद देण्यासाठी दर्दीच नव्हते.
एक लाख ३२ हजार प्रेक्षकक्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये गुरुवारच्या सामन्यासाठी जेमतेम १५ ते १७ हजार प्रेक्षक हजर होते. त्यांच्यातला उत्साहदेखील इतका सैल की विश्वचषक घेऊन मैदानात उतरलेल्या सचिन तेंडुलकरच्या नावाचा जयघोषही झाला नाही. सुरुवातीला जमलेली दहा हजारांची प्रेक्षकसंख्या मावळतीनंतर १७ हजारांपर्यंत पोहोचली. पण भव्य अशा मोदी स्टेडियमचे रितेपण या गर्दीने झाकले गेले नाही.
हेही वाचा >>>Asian Games: भारत-बांगलादेश सेमीफायनल सामन्याचे लाइव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार? जाणून घ्या
गुजरातमधील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मोठय़ा संख्येने तिकिटे खरेदी करून ती महिलांना मोफत वाटल्याचेही वृत्त होते. महिला आरक्षणाचा आनंद साजरा करण्यासाठी ३० ते ४० हजार महिलांना तिकिटे वाटल्याचे भाजपचे पदाधिकारी सांगत होते. मात्र, महिलांनी त्याबाबत उत्साह दाखवलाच नाही.
‘किमग सून’चे गौडबंगाल
येत्या १४ ऑक्टोबरला अहमदाबादेतच होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या तिकीटखरेदीसाठी अॅपवर गेल्यास ‘किमग सून’चा पर्याय समोर दिसतो. या सामन्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातील चाहते येण्यास इच्छूक असताना ‘तिकिटे मिळणार की नाही’ याबाबत साशंकता आहे. त्याचवेळी काही सामन्यांची तिकिटे पूर्णपणे विकली गेल्याचेही अॅपवर दर्शवले जाते. मुळे विश्वचषकाची नक्की तिकीटे किती विकली गेली आणि सामान्य प्रेक्षकांना किती मिळणार, हा प्रश्न कायम आहे.
अॅपवर मात्र ‘हाऊसफुल्ल’
विश्वचषकाच्या तिकिटांची विक्री करणाऱ्या ‘बुक माय शो’ या संकेतस्थळावर बहुतांश सामन्यांच्या तिकिटांची विक्री पूर्ण झाल्याची नोंद आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत पहिल्या सामन्यासाठीची सर्व तिकिटे विकली गेल्याचेही अॅपवर दर्शवत होते. मात्र, मैदानात प्रत्यक्ष चित्र उलटेच दिसून आले.