दुसऱ्या दिवसअखेर विदर्भाच्या ६ बाद २४५ धावा; संजय रघुनाथ, अक्षय वाडकर यांची अर्धशतके

इराणी चषक क्रिकेट स्पर्धा

संजय रघुनाथ आणि अक्षय वाडकर यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर गतविजेत्या विदर्भाने शेष भारताविरुद्ध पहिल्या डावात दिवसअखेर ६ बाद २४५ धावांपर्यंत मजल मारली. मात्र विदर्भाला पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी ८५ धावा हव्या असून चार गडी शिल्लक आहेत. त्यामुळे गुरुवारी दोन्ही प्रतिस्पर्धी संघांमध्ये आघाडीसाठी चुरस असेल.

विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा मदानावर सुरू असलेल्या इराणी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या लढतीत शेष भारताला ३३० धावांवर रोखल्यानंतर विदर्भाने प्रत्युत्तर देताना बऱ्यापकी सुरुवात केली. सलामीवीर संजय आणि कर्णधार फैज फजलने सावध फलंदाजी करत विदर्भाला ५० धावांचा पल्ला गाठून दिला. मात्र हीच धावसंख्या कायम असताना फैजला फिरकीपटू कृष्णप्पा गौतमने २७ धावांवर झेलबाद केले आणि विदर्भाला पहिला धक्का दिला. मात्र पंचाच्या निर्णयावर फैज नाखूश दिसला.

वसीम जाफरच्या जागी संघात स्थान मिळालेला अथर्व तायडे संधीचे सोने करू शकला नाही. राहुल चहारच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका मारताना अथर्व पायचीत झाला आणि केवळ १५ धावांवर तंबूचा रस्ता धरला. अथर्व आणि आर. संजयने २४ धावांची भागीदारी केली. गणेश सतीश आणि आर. संजयने २२ धावांची भागीदारी करत जेवणाच्या वेळेपर्यंत विदर्भाला शंभर धावांचा पल्ला गाठवून दिला.

२३ वर्षीय संजयने चौफेर फटकेबाजी करत यंदाच्या मोसमातील आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. त्याला दुसऱ्या बाजूने गणेश सतीशने चांगली साथ दिली. ६५ धावांवर असताना आर. संजयने धर्मेद्र जडेजाच्या गोलंदाजीवर फटका मारून तो हनुमा विहारीला झेल देऊन बसला. संजयने १६६ चेंडूंत ९ चौकारच्या मदतीने ६५ धावा केल्या. त्यानंतर एका बाजूने गणेश सतीशने सक्षमतेने शेष भारताच्या गोलंदाजांचा सामना केला, परंतु अर्धशतकाच्या दोन धावा दूर असतानाच त्याला धर्मेद्र जडजाने पायचीत केले. गणेशने चार चौकार आणि एक षटकार खेचत मोलाची कामगिरी बजावली.

दुसऱ्या सत्रात विदर्भाचे झटपट दोन गडी बाद झाले. आदित्य १८ धावांवर असताना अंकित राजपूतने त्याला पायचीत केले. आदित्य आणि वाडकरने तब्बल ५८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्यानंतर अक्षय वाडकरने आपले महत्त्वपूर्ण अर्धशतक पूर्ण करून विदर्भाला दिवसअखेर ६ बाद २४५ धावांपर्यंत पोहोचवले. वाडकर नाबाद (५०) तर अक्षय कर्णेवार नाबाद (१५) धावा काढून खेळपट्टीवर कायम आहे.

संक्षिप्त धावफलक

* शेष भारत (पहिला डाव) : ३३०

* विदर्भ (पहिला डाव) : ९० षटकांत ६ बाद २४५ (संजय रघुनाथ ६५, गणेश सतीश ४८; कृष्णाप्पा गौथम २/३३).

Story img Loader