वयाची चाळीशी हा आयुष्याच्या वळणावरील महत्त्वाचा टप्पा. चाळीशीनंतर चेहऱ्यावर पडत जाणाऱ्या सुरकुत्या, स्थूलपणा, स्नायूंचे अवघडलेपण, दुखापती तसेच शरीराची साथ मिळत नसल्यामुळे खेळाडूंच्या कारकीर्दीचा अस्त होत असतो. पण प्रेरणा देणारी अशी अनेक व्यक्तिमत्व आहेत, ज्यांनी वाढत्या वयाची पर्वा न करता आपल्या कामगिरीचा, यशाचा आलेख उंचावला आहे. असाच एक सचिन तेंडुलकर नावाचा सूर्य गेली अडीच दशके आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या क्षितिजावर अजूनही तेजाने तळपत आहे. चाळीसाव्या वयात पदार्पण करणारा सचिन आजही तितकाच तंदुरुस्त, ताजातवाना आणि सर्वासाठी प्रेरणादायी आहे. वयाच्या चाळीशीनंतरही अनेक खेळांमध्ये आपली यशस्वी कारकीर्द घडवून इतरांसाठी प्रेरणादायी ठरलेली बरीच व्यक्तिमत्वे आहेत.
सचिन रमेश तेंडुलकर ही ११ अक्षरे भल्याभल्या गोलंदाजांच्या छातीत धडकी भरणारी आहेत. सचिनने आपल्या जवळपास २४ वर्षांच्या कारकीर्दीत सचिनने कसोटी असो वा एकदिवसीय क्रिकेट फलंदाजीतील अनेक विक्रम आपल्या नावावर केले. तो जणू ‘विश्वविक्रमांचा बादशाह’ ठरला. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक धावा, सर्वाधिक शतकांना सचिनने गवसणी घातली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके झळकावणारा सचिन हा एकमेवाद्वितीय ठरला. सचिनप्रमाणेच इंग्लंडचे विल्फ्रेड ऱ्होड्स (५२ वर्षे), विल्यम ग्रेस आणि जॉर्ज गन (५० वर्षे), जेम्स सदरटन (४९ वर्षे), सर जॅक हॉब्स आणि फ्रँक वुली (४७ वर्षे) तसेच ऑस्ट्रेलियाचे बर्ट आयर्नमोंगर (५० वर्षे) आणि पाकिस्तानचे मिरान बकाश (४७ वर्षे) यांनी चाळीशीनंतरही आपली छाप पाडली होती.
विश्वनाथन आनंद म्हणजे ६४ घरांचा सम्राट. भारताचा पहिला ग्रँडमास्टर ठरलेल्या आनंदने तब्बल पाच वेळा (२०००, २००७, २००८, २०१०, २०१२) विश्वविजेतेपदावर नाव कोरले आहे. सहा वेळा बुद्धिबळ ऑस्कर जिंकणाऱ्या आनंदला आता वयाच्या ४३व्या वर्षी सहावे विश्वविजेतेपद खुणावत आहे. वय वाढल्यानंतर बऱ्याच गोष्टी विस्मरणात जातात पण बुद्धिबळासारख्या बुद्धी, कौशल्य आणि मानसिक कणखरतेच्या बुद्धिबळ खेळात चाळीशीनंतरही चमकदार कामगिरी करणारे अनेक दिग्गज आहेत. युरी अवेरबाख हे ९०व्या वर्षी ठरलेले जगातील सर्वात वयोवृद्ध ग्रँडमास्टर ठरले. ग्रँडमास्टर डेव्हिड ब्रोनस्टेन ८०व्या वर्षांपर्यंत खेळत होते. याच काळात त्यांनी बुद्धिबळावर पुस्तकही लिहिले. आर्थर डेक हे तब्बल ७५ वर्षे बुद्धिबळ स्पर्धामध्ये खेळले. हालरे डेली यांनी ९०व्या वर्षी ५-० असे वर्चस्व गाजवत न्यू हॅम्पशायर बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. बहिरे असलेल्या व्ॉलेरी ग्रेचीहिन यांनी वयाच्या ६०व्या वर्षी ग्रँडमास्टर नॉर्म मिळवला. त्याचबरोबर जेम्स हॅमहॅम, किर्क हॉलंड, विक्टर कोर्चनोई, एडवर्ड लास्कर, जॅरेड मुरे, मिग्युएल नाजडॉर्फ यांच्यासह अनेक जण वयाच्या ८०व्या वर्षांनंतरही मानांकित स्पर्धामध्ये सहभागी होत असत.
व्यावसायिक धावपटू नसलेल्या फौजा सिंग यांनी वयाच्या १००व्या वर्षीही तंदुरुस्ती आणि सुदृढ शरीर कसे राखता येईल, याचा संदेश संपूर्ण जगाला दिला. पंजाबमध्ये जन्मलेल्या फौजा सिंग यांनी वयाच्या ९२व्या वर्षी टोरान्टो मॅरेथॉन शर्यत ५ तास ४० मिनिटांत पूर्ण करत फौजा सिंग यांनी जागतिक विक्रम रचला. शतकमहोत्सवी वर्षांत २००मीटर, ४०० मीटर, ८०० मीटर, १००० मीटर आणि ३००० मीटर या शर्यती विश्वविक्रमी वेळेत पूर्ण करून एकाच दिवशी पाच विश्वविक्रम रचण्याची करामत फौजा सिंग यांनी केली. जानेवारी २०१३मध्ये हाँगकाँग मॅरेथॉन पूर्ण करून वयाच्या १०१व्या वर्षी फौजा सिंग यांनी आपल्या कारकीर्दीला अलविदा केला. कॅनडाचे ईडी व्हिटलॉक यांनी २००३मध्ये ७३व्या वर्षी अवघ्या तीन तासांत मॅरेथॉन शर्यत पूर्ण केली होती.
आतापर्यंतची सर्वोत्तम महिला टेनिस खेळाडू म्हणजे मार्टिना नवरातिलोव्हा. वयाच्या ४०व्या वर्षी टेनिसमधून निवृत्ती पत्करल्यानंतर तीन वर्षांनी पुन्हा पुनरागमन करत नवरातिलोव्हा हिने सहा वर्षांच्या कालावधीत दिग्गज प्रतिस्पध्र्याना धूळ चारत महिला दुहेरीची १२ तर तर मिश्र दुहेरीची तीन जेतेपद पटकावली. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियन, विम्बल्डन आणि अमेरिकनसारख्या ग्रँडस्लॅम जेतेपदांवर मोहोर उमटवण्याची करामत नवरातिलोव्हा हिने केली. वयाच्या ४७व्या वर्षी एकेरीत वाइल्डकार्डद्वारे खेळण्याची संधी नवरातिलोव्हाला मिळाली पण विम्बल्डन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत तिने कॅटालिनो कॅस्टानो हिचा ६-०, ६-१ असा धुव्वा उडवून टीकाकारांची तोंडे बंद केली. एकेरीची लढत जिंकणारी ती सर्वात ज्येष्ठ खेळाडू ठरली. वयाच्या ५०व्या वर्षांपर्यंत खेळणाऱ्या आणि कारकीर्दीत १८ ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या मार्टिना नवरातिलोव्हा हिची कारकीर्द थक्क करणारी अशीच आहे. त्याचबरोबर महान टेनिसपटू जॉन मॅकॅन्रो यांनी ४९व्या वर्षी निवृत्ती पत्करली होती.
जलतरणासारख्या शारीरिक तंदुरुस्तीची सत्वपरीक्षा पाहणाऱ्या खेळात अमेरिकेच्या डारा टोरस हिचे कर्तृत्व ‘आकांक्षांपुढती गगन ठेंगणे’ असे आहे. वयाच्या ४१व्या वर्षी अमेरिकेच्या जलतरण संघात स्थान मिळवल्यानंतर टोरेस हिने ५० मीटर फ्रीस्टाईल, ४ बाय १०० मीटर रिले, ४ बाय १०० मीटर फ्रीस्टाईल रिले या तिन्ही प्रकारात प्रतिनिधित्व करताना २००८च्या ऑलिम्पिकमध्ये तीन रौप्यपदकांवर नाव कोरले. ४०व्या वर्षी पहिल्या मुलीला जन्म दिल्याच्या १५ महिन्यांनंतर टोरेस हिने अमेरिकन राष्ट्रीय स्पर्धामध्ये १०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्णपदक पटकावले. त्याच्या तीन दिवसांनंतर तिने १५व्या वर्षी रचलेला स्वत:चाच विक्रम तब्बल २५ वर्षांनंतर मोडीत काढला.
वयाच्या ७७व्या वर्षी ट्रॅक आणि फिल्ड प्रकारात सरावाला सुरुवात केल्यानंतर कॅनडाच्या अ‍ॅथलीट ओल्गा कोटेल्को यांनी ९० ते ९५ वयोगटात १७ विश्वविक्रम रचण्याची किमया केली. या वयोगटातल्या त्या सर्वोत्तम अ‍ॅथलीट ठरल्या. २०१०मध्ये त्यांनी लांबउडी, उंच उडी, तिहेरी उडी, गोळाफेक, भालाफेक, १००मीटर, २०० मीटर, ४०० मीटर आणि ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीत त्यांनी भाग घेतला आणि २३ नव्या विक्रमांची नोंद केली. वयाच्या ९०व्या वर्षी जगातल्या सर्वोत्तम लांबउडीपटू म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. डॉक्टरांनी ओल्गा यांच्या शरीरातील अवयवांचा आणि मानसिकतेचा अभ्यास केला, त्यावेळी अभ्यासाअंती त्यांचे वय हे ६५ वर्षांच्या व्यक्तीप्रमाणे असावे, हे समोर आले.
‘मि. हॉकी’ म्हणून नावाजलेल्या गॉर्डी होव यांनी वयाच्या ४०व्या वर्षांनंतरच आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. हॉकीतील महान व्यक्तिमत्व असलेल्या होव यांचा १९७२मध्ये ‘हॉल ऑफ फेम’ यादीतही समावेश करण्यात आला. प्रेडो रिबेरो लिमा यांनी ५८व्या वर्षी व्यावसायिक फुटबॉलमध्ये पहिला गोल नोंदवला होता. त्याचबरोबर बॉक्सिंगमध्ये मुहम्मद अली, रँडी कोचर, जॉर्ज फोरमन (बॉक्सिंग), जॉर्ज ब्लांडा, जेरी राइस (फुटबॉल), जॅक निकोलस (गोल्फ), आरनॉल्ड श्वाइनस्टायगर, राय मून, अल्बर्ट बेकलेस (शरीरसौष्ठव) यांनीही चाळीशीनंतर गाजवलेले कर्तृत्व प्रशंसनीय आहे. या सर्वाची कारकीर्द म्हणजे चाहत्यांसाठी प्रेरणास्रोत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक जण आपल्या कारकीर्दीला सुरुवात करतील, अशी अपेक्षा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा