चौथ्या कसोटी सामन्यासह अ‍ॅशेस मालिकेवर इंग्लंडने ३-० असे वर्चस्व प्रस्थापित केले आहे. अखेरच्या जोडीने चिवट झुंज दिल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा पराभव लांबला. परंतु विजयासाठी २९९ धावांचे आव्हान स्वीकारलेल्या ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २२४ धावांत कोसळला. त्यामुळे इंग्लंडने ७५ धावांनी चौथ्या कसोटीवर चौथ्या दिवशीच कब्जा मिळवला आणि अ‍ॅशेस मालिका जिंकण्याची किमया साधली. इंग्लिश क्रिकेटरसिकांनी मग मैदानावर याचा अभूतपूर्व जल्लोष साजरा केला.
ऑस्ट्रेलियाने आपल्या दुसऱ्या डावाला आक्रमक प्रारंभ केला. ख्रिस रॉजर्स आणि डेव्हिड वॉर्नर यांनी २९.२ षटकांत १०९ धावांची दमदार सलामी नोंदवली. त्यावेळी ऑस्ट्रेलिया चौथ्या दिवशीच विजयावर शिक्कामोर्तब करणार अशी चिन्हे दिसत होती. परंतु रॉजर्स (४९) बाद झाला आणि त्यांची घसरगुंडी उडाली. वॉर्नरने खंबीरपणे ७१ धावा काढल्या. पण स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडाली. ब्रॉडने पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही ५० धावांत ६ बळी घेतले.
सकाळच्या सत्रात क्वीन्सलँडचा वेगवान गोलंदाज हॅरिसने आपल्या वेगवान माऱ्याने इंग्लंडच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. त्याने २८ षटकांत ११७ धावांत ७ बळी घेण्याची किमया साधली. सोमवारी सकाळी नव्या चेंडूचा छान फायदा घेत त्याने ४३ धावांत ४ बळी घेतले. रविवारी हॅरिसने इंग्लंडची आघाडीची फळी गुंडाळली होती. आपल्या कारकीर्दीतील १५व्या कसोटी सामन्यात खेळणाऱ्या ३३ वर्षीय हॅरिसने याआधी २०१०मध्ये पर्थ येथे इंग्लंडविरुद्ध ४७ धावांत ६ बळी घेतले होते.
रविवारी शतक झळकावणाऱ्या इयान बेलकडून मोठय़ा अपेक्षा होत्या. परंतु तो फक्त ८ धावांची भर घालून माघारी परतला. त्यानंतर इंग्लंडचा डाव फक्त ३३० धावांवर आटोपला. टिम ब्रेसनन याने ४५ आणि ग्रॅमी स्वानने नाबाद ३० धावा काढल्यामुळे इंग्लंडला सव्वातीनशेचा पल्ला गाठता आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eng take ashes after aus spontaneously combust
Show comments