ICC World Cup 2023 13th Match Afghanistan vs England: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मधील १३वा सामना आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा सामना आयर्लंडशी होत आहे. इंग्लंड संघाला अफगाणिस्तानला हरवून स्पर्धेत दुसरा विजय नोंदवायचा आहे. त्याचबरोबर गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर असलेल्या अफगाणिस्तानला पहिल्या विजयाचे वेध लागले आहे. तत्पुर्वी इंग्लड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून निवडली गोलंदाजी –
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंड संघाने कोणताही बदल न करता मैदानात उतरले आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तान संघात एक बदल करण्यात आला आहे.
इंग्लंड करणार नेट रनरेट सुधारण्याचा प्रयत्न –
पहिल्या सामन्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर इंग्लंड आपली गाडी पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न करेल. गतविजेता इंग्लंड विश्वचषक स्पर्धेतील आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अफगाणिस्तानविरुद्ध मोठा विजय नोंदवून आपला ‘नेट रनरेट’ सुधारण्याचा प्रयत्न करेल. या स्पर्धेत इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही आणि ५ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे झालेल्या सामन्यात न्यूझीलंडकडून ९ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.
जोस बटलरच्या नेतृत्वाखालील संघाने मंगळवारी धरमशाला येथे बांगलादेशचा १३७ धावांनी पराभव करून चांगले पुनरागमन केले. न्यूझीलंडविरुद्ध इंग्लंडसाठी ही फलंदाजी नव्हे तर गोलंदाजी हा चिंतेचा विषय होता. त्यानंतर त्याचे गोलंदाज ख्रिस वोक्स, मार्क वुड, सॅम कुरन, मोईन अली आणि आदिल रशीद हे डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र यांच्यासमोर सामान्य दिसले. कर्णधार बटलर व्यतिरिक्त, हॅरी ब्रूक आणि लियाम लिव्हिंगस्टोन देखील मधल्या फळीत उपयुक्त योगदान देण्यासाठी उत्सुक असतील.
अफगाणिस्तान संघाची प्लेइंग इलेव्हन –
रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इब्राहिम झद्रान, रहमत शाह, हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमतुल्ला उमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नवीन-उल-हक, फजलहक फारुकी.
इंग्लंड संघाची प्लेइंग इलेव्हन –
जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वूड, रीस टोपली.