England vs Afghanistan, World Cup 2023: अफगाणिस्तान संघाने रविवारी (१५ ऑक्टोबर) इंग्लंडचा पराभव करून वन डे इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला. या एकदिवसीय प्रकारातील सर्वात मोठ्या क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेत त्यांनी प्रथमच कसोटी खेळणाऱ्या संघाचा पराभव केला. हा त्यांचा विश्वचषकातील दुसरा विजय असून सलग १४ सामने गमावल्यानंतर त्यांनी या ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. यापूर्वी २०१५ मध्ये त्यांचा एकमेव विजय स्कॉटलंडविरुद्ध होता. स्कॉटलंडकडे कसोटी खेळण्याचा कोणताही विक्रम नाही. या इंग्लंडविरुद्धच्या रोमहर्षक विजयानंतर भारताचे माजी प्रशिक्षक आणि खेळाडू रवी शास्त्री यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
माजी दिग्गज खेळाडू म्हणाले की, “सलाम अफगाणिस्तान! विश्वचषक क्रिकेटमधील सर्वात मोठ्या ऐतिहासिक विजय तुम्ही नोंदवला आहे. क्रिकेट विश्वचषकातील इतिहासात तुम्ही आज दाखवून दिले की जो चांगले प्रदर्शन करेल तोच याचा मानकरी ठरेल. अफगाणी क्रिकेटपटूंविजयी आदर आणखी वाढला आहे.” असे म्हणत त्यांनी ट्वीटरवर ट्वीट केले आहे. जे सध्या खूप व्हायरल होत आहे.
इंग्लंडबद्दल बोलायचे झाले तर १२ वर्षात दुसऱ्यांदा भारतीय भूमीवर त्याला मोठा झटका बसला आहे. २०११ च्या विश्वचषकादरम्यान आयर्लंडने बंगळुरूमध्ये त्यांचा पराभव करून अस्वस्थता निर्माण केली होती. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानचा संघ ४९.५ षटकांत सर्वबाद २८४ धावांवर आटोपला. इंग्लंडसमोर विजयासाठी २८५ धावांचे लक्ष्य होते, परंतु त्यांचा संपूर्ण संघ ४०.३ षटकांत २१५ धावांत सर्वबाद झाला.
फिरकीपटूंनी चमत्कार केला
अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. अनुभवी राशिद खान आणि मुजीब उर रहमान यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. त्याचवेळी ऑफस्पिनर मोहम्मद नबीने दोन विकेट्स आपल्या नावावर केल्या. एकूण, तिघांनीही २५.३ षटके टाकली आणि १०४ धावांत आठ गडी बाद केले. दुसरीकडे, इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांनी ९४ धावा दिल्या आणि त्यांना फक्त पाच विकेट्स घेता आल्या. या सामन्यात दोन्ही संघांच्या फिरकीपटूंनी मिळून एकूण १३ विकेट्स घेतल्या आहेत. विश्वचषकाच्या सामन्यांतील फिरकीपटूंची ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. २००३ मध्ये केनिया-श्रीलंका आणि २०११ मध्ये कॅनडा-झिम्बाब्वे यांच्यातील सामन्यात फिरकीपटूंनी १४-१४ विकेट्स घेतल्या होत्या.
हॅरी ब्रूकशिवाय एकही फलंदाज चालला नाही
इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने सर्वाधिक ६६ धावा केल्या. तो वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. डेव्हिड मलानने ३२, आदिल रशीदने २०, मार्क वुडने १८, रीस टॉपलीने नाबाद १५ आणि जो रूटने ११ धावा केल्या. लियाम लिव्हिंगस्टोन आणि सॅम करन यांनी प्रत्येकी १० धावा केल्या. कर्णधार जोस बटलर आणि ख्रिस वोक्स यांनी प्रत्येकी नऊ धावा केल्या. सलामीवीर जॉनी बेअरस्टो दोन धावा करून बाद झाला.
इंग्लंडच्या नावावर लज्जास्पद विक्रम नोंदवला गेला
इंग्लंडच्या फलंदाजांनी फिरकीविरुद्ध लज्जास्पद विक्रम केले. विश्वचषकात पहिल्यांदाच त्यांचे आठ फलंदाज एका सामन्यात फिरकीपटूंविरुद्ध बाद झाले आहेत. दुसरीकडे, अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी पहिल्यांदाच एका सामन्यात आठ विकेट्स घेतल्या आहेत. यापूर्वी २०१९ मध्ये त्याने कार्डिफमध्ये श्रीलंकेविरुद्ध सहा विकेट्स घेतल्या होत्या.