Eng vs Aus Ashes 2023: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अॅशेस कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याचा आज पाचवा आणि शेवटचा दिवस होता. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत सलग दुसरा विजय मिळवला. अटीतटीच्या सामन्यात कांगारूंनी इंग्लंडवर ४३ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने १५५ धावांची झुंजार दीडशतकी खेळी केली मात्र, ती इंग्लिश संघाला विजयी करण्यात अपयशी ठरली. हा सामना जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे.
पहिल्या कसोटीनंतर इंग्लंडचा संघाचा सलग दुसरा पराभव झाला. त्यांना सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी विजयासाठी २५७ धावा करायच्या होत्या. त्यांच्या हाती सहा विकेट्स होत्या. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने चार विकेट्स गमावत ११४ धावा केल्या होत्या. बेन डकेट ५० आणि कर्णधार बेन स्टोक्स २९ धावांवर नाबाद होते. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ६९ धावांची भागीदारी केली होती. तत्पूर्वी, दुसऱ्या डावात इंग्लंडची सुरुवात खराब झाली. ४५ धावांत त्यांचे चार विकेट्स पडल्या होत्या. जो रूट १८, हॅरी ब्रूक ४, जॅक क्रॉली आणि ऑली पोप प्रत्येकी ३-३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले होते. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्कने प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. ट्रॅविस हेडला एक विकेट घेण्यात यश मिळाले.
तत्पूर्वी, अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या (४/६५) बळावर इंग्लंडने शनिवारी दुसऱ्या अॅशेस कसोटीच्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला २७९ धावांत गुंडाळले. पाहुण्या संघाने इंग्लंडसमोर ३७१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४१६ धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ ३२५ धावांवर गारद झाला. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ९१ धावांची आघाडी मिळाली होती. ऑस्ट्रेलियाने २ बाद १३० धावांवरून दिवसाचा खेळ सुरू केला होता. सामन्याच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव चहापानाच्या वेळी संपला होता.
बेअरस्टो वादग्रस्तपणे धावबाद झाला
जॉनी बेअरस्टो आपल्या सहकारी फलंदाजाशी बोलण्यासाठी चेंडू खेळल्यानंतर क्रीजच्या बाहेर आला, पण अॅलेक्स कॅरीने त्याला धावबाद केले. कॅरीची ही कृती नियमानुसार योग्य होती. मात्र, ते खेळाच्या भावनेविरुद्ध होते. आता ऑस्ट्रेलियन संघ या सामन्यात खूप पुढे गेला आहे. आगामी लढतींमध्ये आणखी वाद होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, बेअरस्टो हा रन आउटचा क्षण कधीच विसरणार नाही. दुसरीकडे सोशल मीडियावर खिलाडूवृत्तीची चर्चा अधिक रंगली आहे. ऑस्ट्रेलियावर नेहमीच रडीचा डाव, चीटिंग असे आरोप होत असतात.