Australia vs England, World Cup 2023: विश्वचषक २०२३मधून बाहेर पडणारा इंग्लंड हा पहिला संघ ठरला आहे. ऑस्ट्रेलियाने ३३ धावांनी दणदणीत विजय मिळवत उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. कांगारुंच्या या विजयाने न्यूझीलंड संघाची उपांत्य फेरीत पोहचण्याची वाट बिकट झाली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवाने त्यांच्या अडचणीत आधीच वाढ झाली होती त्यात ऑस्ट्रेलियाच्या विजयाने आता चौथ्या स्थानी कोणता संघ असणार हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे. अ‍ॅडम झाम्पाला शानदार कामगिरी केल्याबद्दल सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विश्वचषकाच्या ३६व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर कडवे आव्हान ठेवले होते. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांमधील हा सामना खेळला गेला. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. ऑस्ट्रेलियाचा संघ ४९.३ षटकात २८६ धावांवर गारद झाला. इंग्लंडला विजयासाठी २८७ धावा करायच्या होत्या मात्र, त्यांचा संघ २३० धावांत आटोपला. या पराभवासह इंग्लंड उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला. याबरोबरच ऑस्ट्रेलियाने अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्याचा दावा मजबूत केला.

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडसमोर ठेवले होते २८७ धावांचे लक्ष्य

ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला २८७ धावांचे लक्ष्य दिले होते. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑसी संघ ४९.३ षटकांत सर्वबाद २८६ धावांवर आटोपला होता. ऑस्ट्रेलियाला शेवटच्या षटकात दोन धक्के बसले. पहिल्याच चेंडूवर ख्रिस वोक्सने अ‍ॅडम झाम्पाला जोस बटलरकरवी झेलबाद केले. झाम्पाने १९ चेंडूत २९ धावा केल्या. या काळात त्याने चार चौकार मारले. तिसऱ्या चेंडूवर वोक्सने मिचेल स्टार्कला बाद केले. स्टार्कने १३ चेंडूत १० धावा केल्या आणि तो मोईन अलीकडे झेलबाद झाला.

ऑस्ट्रेलियन डावात मार्नस लाबुशेनने सर्वाधिक ७१ धावा केल्या. कॅमेरून ग्रीनने ४७, स्टीव्ह स्मिथने ४४, मार्कस स्टॉयनिसने ३५ आणि अ‍ॅडम झाम्पाने २९ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नर १५, ट्रॅव्हिस हेड ११, पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कने प्रत्येकी १० धावा करून बाद झाले. जोश इंग्लिशला केवळ तीन धावा करता आल्या. जोश हेझलवूड एक धाव घेत नाबाद राहिला. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. मार्क वूड आणि आदिल रशीदने प्रत्येकी दोन गडी बाद केले. डेव्हिड विली आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

हेही वाचा: IND vs SA: प्रसिध कृष्णाच्या येण्याने टीम इंडियात काय बदल होणार? जाणून घ्या दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग-११

२८७ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ ४८.१ षटकांत केवळ २५३ धावाच करू शकला आणि सामना गमावला. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक ६४ धावा केल्या. डेव्हिड मलानने ५० आणि मोईन अलीने ४२ धावांचे योगदान दिले. अखेरीस ख्रिस वोक्सने ३२ धावा केल्या आणि आदिल रशीदने २० धावा करत संघाला विजयाकडे नेण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघांचे प्रयत्न पुरेसे ठरले नाहीत. ऑस्ट्रेलियाकडून अ‍ॅडम झाम्पाने तीन विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. मार्कस स्टॉयनिसला एक विकेट मिळाली.

ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या या पराभवासह इंग्लंडचा’ संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून औपचारिकरित्या बाहेर पडला आहे. याबरोबरच ऑस्ट्रेलियाने अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्याचा दावा मजबूत केला आहे. आता आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये इंग्लंडला स्थान मिळवणे कठीण होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eng vs aus australia beats england by 33 runs former champions out of race for semi finals avw