Australia vs England, World Cup 2023: ऑस्ट्रेलियासाठी उपांत्य फेरीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या या सामन्यात कांगारूंनी इंग्लंडसमोर २८७ धावांचे आव्हान ठेवले आहे. विश्वचषकातील ३६व्या सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय त्याच्या संघाच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवत ऑस्ट्रेलियाला ३००च्या आत धावा करण्यास रोखले. या शानदार कामगिरीमुळे इंग्लंडला हा सामना जिंकण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. ही खेळपट्टी फलंदाजीला पोषक असल्याने तसेच रात्री दवाचा परिणाम पाहता इथे ३०० धावांचा देखील टप्पा गाठला जाऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विश्वचषक २०२३मध्ये आतापर्यंत ऑस्ट्रेलियाने सहापैकी चार सामने जिंकले असून त्यांचे आठ गुण आहेत. दुसरीकडे, इंग्लंडने सहापैकी पाच सामने गमावले आहेत. त्याचे फक्त दोन गुण आहेत. त्याचबरोबर आज जर इंग्लंडचा संघ पराभूत झाला तर तो अधिकृतपणे स्पर्धेतून बाहेर पडेल. त्यामुळे किमान प्रतिष्ठा जपण्यासाठी तरी त्यांना आजचा सामना जिंकणे आवश्यक आहे.

तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन संघाने आजच्या सामन्यात दोन मोठे बदल केले. कौटुंबिक कारणांमुळे मायदेशी परतलेले जखमी ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल मार्श यांच्या जागी कॅमेरून ग्रीन आणि मार्कस स्टॉयनिस यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, इंग्लंडने एकही बदल केला नाही.

इंग्लंडला आव्हानात्मक लक्ष्य मिळाले

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला २८७ धावांचे लक्ष्य दिले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या कांगारूंचा संघ ४९.३ षटकांत सर्वबाद २८६ धावांवर आटोपला. कांगारू संघाला शेवटच्या षटकात दोन धक्के बसले. पहिल्याच चेंडूवर ख्रिस वोक्सने अॅडम झाम्पाला जोस बटलरकरवी झेलबाद केले. झाम्पाने १९ चेंडूत २९ धावा केल्या. या काळात त्याने चार चौकार मारले. तिसऱ्या चेंडूवर वोक्सने मिचेल स्टार्कला बाद केले. स्टार्कने १३ चेंडूत १० धावा केल्या आणि तो मोईन अलीकडे झेलबाद झाला.

ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लाबुशेनने सर्वाधिक ७१ धावा केल्या. कॅमेरून ग्रीनने ४७, स्टीव्ह स्मिथने ४४, मार्कस स्टॉयनिसने ३५ आणि अ‍ॅडम झाम्पाने २९ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नर १५, ट्रॅव्हिस हेड ११, पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्कने प्रत्येकी १० धावा करून बाद झाले. जोश इंग्लिशला केवळ तीन धावा करता आल्या. जोश हेझलवूड एक धाव घेत नाबाद राहिला. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. मार्क वूड आणि आदिल रशीदने प्रत्येकी दोन गडी बाद केले. डेव्हिड विली आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

हेही वाचा: World Cup 2023: हसन रझा यांच्या ‘भारताला वेगळा चेंडू दिला’ या वक्तव्यावर वसीम अक्रम संतापला; म्हणाला,“डोकं ठिकाणावर…”

दोन्ही संघांचे प्लेइंग-११

इंग्लंड: जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (यष्टीरक्षक), मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड.

ऑस्ट्रेलिया: डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिश (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉयनिस, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अ‍ॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eng vs aus australia was all out for 286 runs against england marnus labuschagne scored a half century avw
Show comments