Ashes ENG vs AUS 2023: ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ जितका मजबूत आहे तितकाच त्यांच्यावर स्लेजिंग आणि फसवणुकीचे विविध आरोप देखील मागील काही वर्षात झाले आहेत. बॉल टेम्परिंग प्रकरणानंतर ऑस्ट्रेलियन संघाचे मैदानावरील स्लेजिंगचे प्रमाण कमालीचे कमी झाले आहे. मात्र असे जरी असले तरी देखील ते नेहमीच मोठ्या आणि महत्वाच्या सामन्यांमध्ये काही ना काहीतरी अशी वादग्रस्त कृती करतात जेणेकरून त्याची सोशल मीडियावर चर्चा होत असते. असेच काहीसे अॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑली रॉबिन्सनचा लाबुशेनने घेतलेला झेल हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना एजबॅस्टन येथे खेळवला जात आहे. सोमवारी (१९ जून) सामन्याच्या चौथ्या दिवशी २८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने खेळ संपेपर्यंत तीन गड्यांच्या मोबदल्यात १०७ धावा केल्या होत्या. त्याला विजयासाठी पाचव्या आणि शेवटच्या दिवशी आणखी १७४ धावा कराव्या लागतील. मात्र, त्यादरम्यान ऑली रॉबिन्सनचा लाबुशेनने घेतलेला झेल सध्या वादात सापडला आहे. तो सोशल मीडियावर सध्या खूप ट्रोल होत आहे.
ऑली रॉबिन्सन बाद की नाबाद?
सध्या एजबॅस्टन येथे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेस २०२३चा पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. खेळाच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेनने ऑली रॉबिन्सनचा एक चांगला झेल जवळजवळ पकडला. हे सर्व इंग्लंडच्या दुसऱ्या डावातील ५५व्या षटकात घडले. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड गोलंदाजी करत होता तर ऑली रॉबिन्सन फलंदाजी करत होता.
हेही वाचा: IND vs PAK: अखेर पाकिस्तानी संघाला मिळाला व्हिसा, ‘या’ दिवशी रंगणार भारत-पाक महामुकाबला
हेझलवूडच्या त्याच षटकातील पहिला चेंडू बाउन्सर टाकला टाकला. हा चेंडू टाळण्यासाठी ओली रॉबिन्सन खाली वाकला पण चेंडू त्याच्या मनगटावर लागला आणि तो लेग साईडला हवेत उडाला. मार्नस लाबुशेन फलंदाजाच्या डाव्या बाजूला उभा होता जिथे त्याने चेंडू पकडला. मात्र, रिप्ले पाहिल्यावर आधी चेंडू जमिनीवर आदळला आणि नंतर मार्नस लाबुशेनने झेल पकडला असे दिसून आले. त्यावर त्याने अपील देखील केले. यानंतर फिल्ड अंपायर यांनी हा निर्णय थर्ड अंपायरकडे सोपवला आणि त्यात चेंडू स्पष्टपणे जमिनीला लागलेला दिसत होता म्हणून त्यांनी रॉबिन्सनला नाबाद घोषित केले.
यासर्व प्रकारानंतर मार्नस लाबुशेन सोशल मीडियावर ट्रोल झाला असून त्याच्यावर इंग्लंड आणि भारताच्या खेळाडूंनी देखील टीका केली आहे. कारण, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३च्या अंतिम सामन्यात देखील ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनने असाच एक शुबमन गिलचा वादग्रस्त झेल पकडला होता. त्यानंतर त्याच्यावर प्रचंड टीका झाली होती. एका चाहत्याने ट्विटरवर म्हटले आहे की, “ऑस्ट्रेलिया नेहमी रडीचा डाव खेळते. स्पोर्ट्समॅन स्पिरीट नावाची काही गोष्ट असते हे त्यांना माहितीच नाही.”
सामना रोमांचक स्थितीत पोहचला आहे
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एजबेस्ट कसोटीच्या चौथ्या दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात ३ बाद १०७ धावा केल्या आहेत. त्यांना विजयासाठी २८१ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. अशा स्थितीत सामन्याच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी त्याला विजयासाठी आणखी १७४ धावा कराव्या लागतील. ऑस्ट्रेलियाच्या अजून सात विकेट शिल्लक आहेत. पहिल्या डावात शतक झळकावणारा उस्मान ख्वाजा ३४ आणि स्कॉट बोलंडने १३ धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात तीन धक्के बसले. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरले. वॉर्नर ३६, लाबुशेन १३ आणि स्टीव्ह स्मिथ सहा धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. स्टुअर्ट ब्रॉडने दोन विकेट्स घेतले. त्याचबरोबर ओली रॉबिन्सनने एक विकेट आपल्या नावावर केली आहे.