England vs Australia 5th ODI Scorecard: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत हॅरी ब्रूकला प्रथमच इंग्लंड एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आणि त्याने कर्णधार म्हणून पहिल्याच एकदिवसीय मालिकेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या एकदिवसीय मालिकेत हॅरी ब्रूकने ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतक्या धावा केल्या की त्याने विराट कोहलीचा विश्वविक्रम मोडला आणि त्याला मागे टाकत पुढे गेला. हॅरी ब्रूकने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात ही कामगिरी केली.

हॅरी ब्रुकने तोडला विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड

हॅरी ब्रूकने ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात ब्रिस्टलमध्ये कांगारू संघाविरुद्ध वेगवान खेळी खेळली आणि त्याने ५२ चेंडूत ७ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ७२ धावा केल्या. या खेळीनंतर त्याने विराट कोहलीचा ५ वर्षे जुना विश्वविक्रम मोडला. हॅरी ब्रूकने कांगारू संघाविरुद्धच्या या ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत एकूण ३१२ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनला.

हेही वाचा – WTC Points Table: श्रीलंकेमुळे ऑस्ट्रेलियाचा WTC अंतिम फेरीचा मार्ग खडतर; कसोटी मालिकेत न्यूझीलंड संघावर मिळवला एकतर्फी विजय

विराट कोहलीने २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत कर्णधार म्हणून ३१० धावा केल्या होत्या, परंतु ब्रूकने २०२४ साली या संघाविरुद्ध कर्णधार म्हणून ३१२ धावा करून कोहलीला मागे टाकत पहिले स्थान पटकावले. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर एमएस धोनी आहे, ज्याने कर्णधार म्हणून २००९ मध्ये कांगारू संघाविरुद्धच्या द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत एकूण २८५ धावा केल्या होत्या, तर चौथ्या क्रमांकावर इयॉन मॉर्गन आहे, ज्याने २०१५ मध्ये कर्णधार म्हणून कांगारूविरूद्ध २७८ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – IPL Auction 2025: विदेशी खेळाडूंवर वचक बसवण्यासाठी BCCI ची युक्ती, आयपीएलमध्ये ‘हा’ नियम मोडल्यास दोन वर्षांची बंदी

आता इंग्लंडचा हॅरी ब्रूक ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनला आणि त्याने मॉर्गनला मागे टाकले. कर्णधार म्हणून बाबर आझमने २०२२ साली कांगारू संघाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत एकूण २७६ धावा केल्या होत्या.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या द्विपक्षीय वनडे मालिकेत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा

३१२ धावा – हॅरी ब्रूक (इंग्लंड, २०२४)
३१० धावा – विराट कोहली (भारत, २०१९)
२८५ धावा – एमएस धोनी (भारत, २००९)
२७८ धावा – इऑन मॉर्गन (इंग्लंड, २०१५)
२७६ धावा – बाबर आझम (पाकिस्तान, २०२२)