ENG vs AUS, Ashes series 2023: ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लाबुशेन हा जागतिक क्रिकेटमधील सर्वात मनोरंजक पात्रांपैकी एक असा खेळाडू आहे. कसोटीतील हा जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज त्याच्या कोणत्या ना कोणत्या स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असतो. लाबुशेन तोंडात च्युइंगम चघळल्याशिवाय क्वचितच मैदानात प्रवेश करतो. २९ वर्षीय फलंदाज केवळ धावा करण्यातच माहीर नाही, तर तो मैदानात चाहत्यांचे भरपूर मनोरंजनही करतो. लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेतील दुसऱ्या कसोटीत लाबुशेनने नेमके तेच केले. त्याने जमिनीवर पडलेला च्युइंगम पुन्हा तोंडात टाकला. त्याची ही कृती कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
लाबुशेनची ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद
ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४५व्या षटकात ही घटना घडली. त्यानंतर लाबुशेन स्टीव्ह स्मिथसोबत क्रीजवर होता. हँड ग्लोव्हज लावताना लाबुशेनच्या तोंडातून च्युइंगम पडले आणि त्याने खेळपट्टीवर पडलेले ते च्युइंगम उचलून तोंडात घातले ही कृती त्याची कॅमेऱ्यात कैद झाली. यानंतर त्याच्या लाजिरवाण्या कृतीने जगभरातील त्याच्या चाहत्यांची आणि पर्यायाने ऑस्ट्रेलिया मान शरमेने खाली गेली. क्वीन्सलँडच्या फलंदाजाने च्युइंगम उचलून तोंडात घातला यामुळे नेटकरी ऑस्ट्रेलियन फलंदाजाला चांगलेच ट्रोल करत आहेत. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली असून आता ही घटना सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
WTC फायनलमध्ये लाबुशेन फलंदाजीला येण्याआधी ड्रेसिंगरुममध्ये झोपतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
यापूर्वी किंग्स्टन ओव्हल येथे झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये लाबुशेनही असाच काहीसा त्याच्या एका कृतीमुळे चर्चेत होता. मात्र, यामागचे कारण त्याची फलंदाजी नसून पॅव्हेलियनमध्ये झोपणे हे होते. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात डेव्हिड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजा फलंदाजीला आले होते. वॉर्नर लवकर बाद झाला. तेव्हाच कॅमेरा लाबुशेनकडे वळला आणि त्याने नुकतीच एक खुर्ची ड्रेसिंग रुमच्या बाहेर आणली होती आणि तो झोपला होता. तेवढ्यात वॉर्नर बाद झाल्यानंतर प्रेक्षकांच्या आवाजाने तो जागा झाला. मग पटकन स्वतःला तयार करून तो मैदानावर पोहचला. ही घटना त्यावेळी सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली होती.
आतापर्यंत काय घडलं मॅचमध्ये?
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर तिसऱ्या दिवसाचा उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात इंग्लंड संघाला पहिल्या डावात ३२५ धावांत गुंडाळले. त्यांना ९१ धावांची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४१६ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवसाच्या ४ विकेट्सच्या मोबदल्यात २७८ धावांवरून पुढे खेळायला आलेला इंग्लिश संघ तिसऱ्या दिवशीच पहिल्याच सत्रात कोसळला. त्यांना त्यांच्या धावसंख्येमध्ये केवळ ४८ धावांची भर घालता आली. यात त्यांचे सहा फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले.
इंग्लंडकडून पहिल्या डावात बेन डकेटने ९८ आणि हॅरी ब्रूकने ५० धावा केल्या. जॅक क्रॉली ४८ आणि ऑली पोप ४२ धावा करून बाद झाले. बेन स्टोक्स १७, जॉनी बेअरस्टो १६, स्टुअर्ट ब्रॉड १२ आणि जो रूट १० धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. ओली रॉबिन्सनने ९ आणि जोश टोंगने अवघी १ धाव केली. जेम्स अँडरसन खाते न उघडता नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूड आणि ट्रॅव्हिस हेड यांना प्रत्येकी दोन विकेट्स घेण्यात यश मिळाले. पॅट कमिन्स, नॅथन लायन आणि कॅमेरून ग्रीन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, स्टीव्ह स्मिथने ११० धावांची खेळी केली, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात ४१६ धावा करता आल्या होत्या. स्मिथचे हे एकूण ३२वे कसोटी शतक होते. त्याने १७४ डावांमध्ये सर्वात वेगवान ३२ कसोटी शतके झळकावली आहेत. त्यांच्याशिवाय वॉर्नरने ६६, लाबुशेनने ४७ आणि ट्रॅव्हिस हेडने ७७ धावा केल्या. ओली रॉबिन्सन आणि जोश टोंग यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतले. जो रूटला दोन गडी बाद करण्यात यश मिळाले. त्याचवेळी जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडला प्रत्येकी एक विकेट मिळाली.