भारत आणि इंग्लंडदरम्यान खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेचा महत्त्वाचा भाग बनलेला चाहता जार्वो पुन्हा एकदा मैदानात पोहोचला. ओव्हल कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जार्वोने भारताची जर्सी परिधान करून मैदानात प्रवेश केला आणि इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टोला टक्कर दिली. तेव्हापासून, ‘जार्वो ६९’ पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रेंड करायला लागला आहे. तो तिसऱ्यांदा अशा प्रकारे मैदानात घुसला आहे.
ओव्हल मैदानावरील सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात फलंदाजी करत असताना जार्वोने मैदानात प्रवेश केला. वेगवान गोलंदाज उमेश यादव ३४व्या षटकाचा तिसरा चेंडू टाकत होता, तत्पूर्वी जार्वो गोलंदाजीसाठी मैदानात धावत आला. यावेळी तो इंग्लंडचा फलंदाज जॉनी बेअरस्टोला जाऊन धडकला. सुरक्षारक्षकांनी त्याला पळत जाऊन बाहेर काढले.
सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी जार्वोला मालिकेचा मनोरंजनकर्ता म्हटले, तर हर्षा भोगलेंनी त्याला मुर्ख आणि धोकादायक म्हटले. ”मला वाटते की इंग्लंडमधील मैदानावर काही लोकांना काढून टाकणे आवश्यक आहे. ही एक अतिशय गंभीर सुरक्षा चूक आहे आणि ती चालूच आहे. आता प्रँक नाही. #जार्वो #इडियट”, असे ट्वीट भोगलेंनी केले आहे.
I think a few people need to be sacked at grounds in England. This is a very serious security lapse and it just continues. Not even a prank anymore. #Jarvo #Idiot.
— Harsha Bhogle (@bhogleharsha) September 3, 2021
हेही वाचा – आशियाचा किंग..! खराब फॉर्मशी झगडणाऱ्या विराटची मैदानाबाहेर मोठी कामगिरी
लॉर्ड्स कसोटीत रोहित शर्मा बाद झाला तेव्हा तो पॅड आणि हेल्मेट घालून मैदानात दाखल झाला. यादरम्यान एका चाहत्याने त्याच्यासाठी मैदानात बॅटही फेकली. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला मैदानाबाहेर नेले. यानंतर, जेव्हा भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत होता, तो पुन्हा एकदा मैदानात पोहोचला. त्यावेळी तो भारतीय संघासाठी क्षेत्ररक्षक उभारल्यासारखी प्रतिक्रिया देत होता. त्याला पाहून मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांना हसू आवरता आले नाही.
सुरक्षेचा भंग केल्याप्रकरणी जार्वोवर लीड्स मैदानावर आजीवन बंदी घालण्यात येणार असल्याचे यॉर्कशायर काउंटी क्रिकेट क्लबने सांगितले होते.