भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या अतिशय वाईट फॉर्मशी झगडत आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्यात त्याला सातत्याने अपयश आले आहे. त्यामुळे अनेक माजी खेळाडूंनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्याला टी २० विश्वचषकामध्ये संधी देऊ नये, असेही काहींचे म्हणणे आहे. या सर्व नकारात्मक वातावरणामध्ये प्रसिद्ध भारतीय समालोचक हर्षा भोगले यांनी विराट कोहलीला एक विशेष सल्ला दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराट कोहलीने आपला फॉर्म परत मिळवण्यासाठी जास्तीत जास्त एकदिवसीय सामने खेळले पाहिजे, असे भोगले यांचे म्हणणे आहे. याबाबत त्यांनी एक ट्वीटही केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “विराट कोहलीला फॉर्ममध्ये परत येण्यासाठी एकदिवसीय क्रिकेट हा सर्वोत्तम मार्ग आहे. या सामन्यांमध्ये त्याला, धावगतीचा दबाव किंवा भरपूर स्लिप्स असलेल्या स्विंग चेंडूच्या माऱ्याचा सामना करावा लागणार नाही. त्यामुळे तो जर वेस्ट इंडिजमध्येही एकदिवसीय सामने खेळला तर त्याला फायदा होऊ शकतो.”

हर्षा भोगले यांच्या या ट्वीटला अनेक चाहत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हर्षा यांनी सुचवलेली पद्धत विराट कोहलीसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, असा विश्वास चाहत्यांना आहे. त्यामुळे अनेकांनी भोगलेंना पाठिंबाही दिला आहे.

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात होत असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली खेळू शकलेला नाही. मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे तो खेळत नसल्याचे कारण देण्यात आले आहे. विराट यावर्षी नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. पण आता तो इंग्लंड आणि वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला तर त्याला फॉर्ममध्ये परतण्याची नक्कीच संधी मिळेल.

विराटने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत आतापर्यंत २६० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने १२ हजार ३११ धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहलीच्या नावावर ४३ शतकांची नोंद आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eng vs ind odi harsha bhogle gave special suggestion to virat kohli to return in form vkk