ओव्हल कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय कर्णधार विराट कोहली इंग्लंडचा सलामीवीर हसीब हमीदच्या एका कृत्यामुळे खूपच संतापला. पहिल्या डावात भारताचा डाव १९१ धावांवर आटोपला, त्यानंतर इंग्लंडचे सलामीवीर रोरी बर्न्स आणि हसीब हमीद फलंदाजीसाठी उतरले. फलंदाजी करताना हमीदने गार्ड घेऊन क्रीजवर ‘छेडछाड’ केली. हमीदने क्रीजच्या बाहेर गार्ड घेतले. त्याचे हे कृत्य पाहून विराटने अंपायरडे तक्रार केली.

कोणताही फलंदाज जेव्हा क्रीजवर येतो, तेव्हा आधी तो आपला गार्ड घेतो. गार्ड घेणे म्हणजे ज्या ठिकाणी त्याला उभे राहायचे आहे आणि चेंडूंना सामोरे जायचे आहे ते ठिकाण मार्क करणे. यासाठी फलंदाज त्या ठिकाणी पायाने किंवा कधीकधी बॅटने खुणा करतात. मात्र, फलंदाजाला खेळपट्टीवर सर्वत्र खुणा करण्यास मनाई आहे. आयसीसीच्या नियमानुसार, कोणताही फलंदाज क्रीजपासून ५ फूट दूर गेल्यानंतर खुणा करू शकत नाही. या भागात फलंदाजांनाही धावण्यास मनाई आहे.

 

बहुतेक वेळा गोलंदाज या भागात आपले चेंडू उसळवतात. हसीब हमीद आपल्या शूजच्या स्पाईक्सने ही जागा मार्क करताना दिसला, हा प्रकार विराटला आवडला नाही. त्याने याबाबत पंचांकडे तक्रारही केली. आयसीसीच्या नियमानुसार, खेळपट्टीमध्ये छेडछाड झाल्यास प्रथमच अंपायर फलंदाजाला इशारा देतो. दुसऱ्यांदा चूक पुन्हा केल्याबद्दल फलंदाजाच्या ५ धावा वजा केल्या जातात. मात्र, हसीब ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावात फार काही करू शकला नाही. खाते न उघडता १२ चेंडूंचा सामना केल्यानंतर तो जसप्रीत बुमराहचा बळी ठरला.

पहिल्या दिवसअखेर…

केनिंग्टनच्या ओव्हल मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटीला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने पहिल्या डावात ३ बाद ५३ धावा केल्या आहेत. मालिकेत दमदार फॉर्मात असलेला इंग्लंडचा कर्णधार जो रूट मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ख्रिस वोक्स, ओली रॉबिन्सन यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने भारताला ६१.३ षटकात १९१ धावांत गारद केले. सामन्यात संधी मिळालेल्या मुंबईकर शार्दुल ठाकूरचे झटपट अर्धशतक टीम इंडियाला दोनशे धावांच्या जवळ घेऊन गेले. कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी योगदान दिले. दुखापतीतून सावरलेल्या ख्रिस वोक्सने ४ बळी घेत आपले पुनरागमन यशस्वी केले आहे. पाच सामन्यांची ही मालिका सध्या १-१ने बरोबरीत आहे.

Story img Loader