लॉर्ड्सच्या दुसऱ्या कसोटीत संस्मरणीय विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये फारशी चमक दाखवला आलेली नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताना पहिल्या डावात इंग्लंडने ३४५ धावांची मोठी आघाडी घेऊन सामन्यावरील पकड मजबूत केली आहे. असं असतानाच दुसरीकडे भारतीय संघाची परिस्थिती या सामन्यात तरी फार चिंताजनक दिसत आहे. पाहिल्या दिवशी फलंदाजांनी नांगी टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी घोर निराशा केल्याचं पहायला मिळालं. या सामन्यातील भारताच्या कामगिरीवरुन कर्णधार विराट कोहलीवर टीका केली जात आहे. केवळ कर्णधार म्हणून नाही तर वैयक्तिक पाळीवरील कामगिरी आणि कोहली मैदानात उगाच दाखवत असलेला आक्रमकपणामुळे टीकेचा धनी ठरत आहे. यावरुन भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समाचेलक सुनिल गावसकर यांनी कोहलीवर टीका केलीय.
झालं असं की सामन्यामध्ये समालोचन करताना दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर आणि इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनमध्ये शाब्दिक वाद झाला. सध्याच्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघापेक्षा भारताच्या मागील क्रिकेट संघांना मैदानात धमकावणे (बुलींग करणे) सोपे होते, असे विधान हुसेनने केलं. आमच्या पिढीतील क्रिकेटपटूंना धमकावले जाऊ शकते, असं तुझं म्हणणं असेल तर मला फार राग येईल, असं गावसकरांनी हुसेनला सांगितलं. इंग्लंडच्या माजी कर्णधाराने लिहिलेल्या एका लेखावरुन या दोघांचा एका लेखावरून लाइव्ह कॉमेंट्रीदरम्यान वाद झाला. हा लेख हुसेनने एका ब्रिटिश वृत्तपत्रासाठी लिहिला आहे. त्यात हुसेनने लिहिले आहे, की पूर्वीचे भारतीय संघ या वर्तमान संघाच्या तुलनेत एवढे मजबूत नव्हते. गावसकर यांनी या लेखावरुन ऑन-एअर असताना हुसेनला फैलावर घेतलं. ”तू म्हणालास की या भारतीय संघाला धमकावले जाऊ शकत नाही, तर मागील पिढीच्या संघांना धमकावले जाऊ शकत होते का?. तू कोणत्या पिढीबद्दल बोलत आहेस ते सांग? आणि बुलींग करणे म्हणजे नक्की काय अपेक्षित आहे?” असा प्रश्नांचा मारा गावसकर यांनी केला.
”मला फक्त असे वाटते की पूर्वीचे भारतीय संघ आक्रमकतेला नकार द्यायचे, पण कोहलीने जे केले ते दुहेरी आक्रमकता दर्शवण्यासारखं वाटतं. मी त्याची एक झलक सौरव गांगुलीच्या संघात पाहिली आणि त्याने सुरुवात केली. विराट संघात नसतानाही अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियन संघावर वर्चस्व गाजवले,” असं हुसेन आपली बाजू मांडताना म्हणाला.
मात्र गावसकर यांनी हे स्पष्टीकरण अमान्य केलं. “आधीच्या पिढीमधील संघाला धकमावले जाऊ शकत होतं असं तू म्हणतोयस पण मला असे वाटत नाही. माझ्या पिढीवर बुलींग केलं जायचं असं म्हटलं तर मला खूप राग येईल. जर तू रेकॉर्ड्स बघितले तर १९७१ मध्ये आम्ही जिंकलो, हा माझा पहिला इंग्लंड दौरा होता. १९७४ मध्ये आमच्या संघामध्ये अंतर्गत समस्या होत्या त्यामुळे आम्ही ०-३ ने हरलो. १९७९ मध्ये आम्ही ०-१ ने हरलो, ओव्हलवर ४२९ धावांचा पाठलाग केला असता तर मालिका १-१ होऊ शकली असती,” असं गावसकर जुने संदर्भ देत म्हणाले.
तसेच हुसेन विराटच्या आक्रमकतेचं कौतुक करत असतानाच गावसकर यांनी केवळ दाखवण्यापुरता आक्रमकपणा चांगला नसल्याचं मत व्यक्त केलं. “मला वाटतं नाही की आक्रमक असणं म्हणजे सतत विरोधकांवर धावून जाणं. तुम्ही तुमचं पॅशन हे कृतीतून दाखवण्याची गरज नसते. तुम्ही तुमच्या संघाप्रती असणारी बांधिलता ही विरोधकांची प्रत्येक विकेट गेल्यानंतर आरडाओरड न करताही दाखवू शकता,” असं गावसकर यांनी म्हटलं. अर्थात त्यांच्या या वक्तव्याचा रोख विराटच्या सेलिब्रेशनच्या दिशेने होता.
मात्र विराट आपल्या बोलण्यातून संघामध्ये प्राण आणि उत्साह निर्माण करु शकतो या हुसेनच्या वक्तव्याशी गावसकर यांनी सहमती दर्शवली. मात्र आधीच्या संघांवर बुलिंग म्हणजेच दादागिरी करता येत होती हे विधान मान्य नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.