नेदरलँड आणि इंग्लंडदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना आज (१७ जून) नेदरलँडमधील व्हीआरए क्रिकेट मैदानावर झाला. हा एकदिवसीय सामना ऐतिहासिक ठरला आहे. पाहुण्या इंग्लंड संघाने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभी केली. इंग्लंडच्या संघाने केवळ चार गडी गमावून ४९८ धावांचा डोंगर उभा केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. सलामीवीर जेसन रॉय दुसऱ्याच षटकात एका धावेवर बाद झाला. त्यानंतर फिलिप सॉल्ट आणि डेव्हिड मलान यांनी संघाचा डाव सांभाळत आक्रमक खेळाला सुरुवात केली. या दोन्ही दुसऱ्या गड्यासाठी २२२ धावांची भागीदारी केली. दोघांनीही आपापली शतके पूर्ण केली. सॉल्टने १२२ तर मलानने १२५ धावांचे योगदान दिले.

त्यानंतर जोस बटलर आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनी उरलेली कसर भरून काढली. जोस बटलरने अवघ्या ७० चेंडूंत १४ षटकार आणि सात चौकारांच्या मदतीने १६२ धावांची नाबाद खेळी केली. लियाम लिव्हिंगस्टोननेही नेदरलँड्सच्या गोलंदाजांना अजिबात दया दाखवली नाही. त्याने २२ चेंडूत सहा षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या. लियाम लिव्हिंगस्टोनने १७ चेंडूत इंग्लंडसाठी सर्वात जलद अर्धशतक पूर्ण केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eng vs ned england put highest odi score on the board vkk