पाकिस्तान आणि इंग्लंड संघात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना मुलतान येथे सुरु आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड क्रिकेट संघाने शुक्रवारी, पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मैदानात उतरताच इतिहास रचला आहे. २००० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा इंग्लंड हा जागतिक क्रिकेटमधील पहिला संघ ठरला आहे.
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना मुलतानमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलतान कसोटीत इंग्लंडची आक्रमक फलंदाजी शैली आतापर्यंत जबरदस्त होती. पहिल्या सत्रात पाहुण्या संघाने ३३ षटकांत ५ गडी गमावून १८० धावा केल्या आहेक. विल जॅक क्रीझवर कर्णधार बेन स्टोक्सला साथ देत आहे.
इंग्लंडच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांबद्दल बोलायचे तर, या संघाने आतापर्यंत १०५७ कसोटी, ७७३ वनडे आणि १७० टी-२० सामने खेळले आहेत. इंग्लंडनंतर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. कांगारूंनी आतापर्यंत एकूण १९९५ सामने खेळले आहेत. त्याचबरोबर भारत १७७५ सामन्यांसह या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. तसेच पाकिस्तान १६०८ सामन्यांसह चौथ्या स्थानावर आहे.
सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारे संघ –
१.इंग्लंड – २०००*
२.ऑस्ट्रेलिया – १९९५*
३.भारत – १७७५
४.पाकिस्तान – १६०८
५.वेस्ट इंडिज – १५९५
पदार्पण करणाऱ्या अबरार अहमदने घेतल्या ५ विकेट्स –
पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचे तर, जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी ३८ धावा जोडल्या होत्या. इंग्लिश संघाला क्रॉलीच्या रूपाने पहिला धक्का बसला, तो १९ च्या वैयक्तिक धावसंख्यवर त्रिफळाचित झाला. यानंतर डकेट (६३) आणि ऑली पोप (६०) यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी ७९ धावांची भागीदारी झाली, पण ते बाद झाल्यानंतर जो रूट आणि हॅरी ब्रूक्स स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतले. या सामन्यात पदार्पण करणाऱ्या अबरार अहमदने इंग्लंडच्या या सर्व ५ विकेट घेतल्या. अबरारने आतापर्यंत १३ षटकात ५.४० च्या इकॉनॉमीसह ७० धावा दिल्या आहेत.