England vs South Africa ICC Cricket World Cup 2023 Match Updates: भारतात खेळल्या जात असलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या २० व्या सामन्यात विश्वविजेता इंग्लंडचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होत आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याला दुपारी २ वाजता सुरुवात होणार आहे. दोन्ही संघ विजय मिळवून उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्याचे लक्ष्य ठेवणार आहेत. हा सामना इंग्लंडसाठी खूप महत्त्वाचा आहे. येथील पराभवामुळे इंग्लंडचा उपांत्य फेरीचा मार्ग अशक्य होऊ शकतो. तत्पूर्वी इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
इंग्लंड संघाचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाला सामन्यापूर्वी दुखापत झाली आहे. तो या सामन्यात खेळत नाही. त्याचबरोबर इंग्लंड संघात तीन बदल करण्यात आले आहेत. बेन स्टोक्स, गस ऍटिन्सन आणि डेव्हिड विलीचे पुनरागमन झाले आहे. सॅम करन आणि ख्रिस वोक्स सामन्यातून बाहेर आहेत.
पन्नास षटकांच्या विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडचा विक्रम ४-३ असा असला, तरी यावेळी दक्षिण आफ्रिकेची कामगिरी सरस ठरली आहे. इंग्लंडचा संघ प्रत्येक विभागात संघर्ष करत असून त्याचे मनोधैर्य खचले आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडचा न्यूझीलंडकडून पराभव झाला होता. यानंतर इंग्लंडने बांगलादेशचा पराभव केला, पण अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवाने त्यांचे मनोबल खालावले. त्यामुळे इंग्लंड संघाला एक युनिट म्हणून खेळावे लागेल.
दक्षिण आफ्रिकेने स्पर्धेच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेचा शंभरहून अधिक धावांनी पराभव केला होता, पण डच संघाकडून झालेल्या पराभवामुळे संघ दबावाखाली विखुरतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. टेम्बा बावुमाला कधीही फलंदाज म्हणून सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नाही, पण गेल्या वर्षभरात त्याने कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. सलग दोन शतके झळकावत क्विंटन डी कॉकने आपणही मागे नसल्याचे दाखवून दिले. एडन मार्कराम आणि रॅसी वँडर ड्युसेन देखील फॉर्मात आहेत आणि परिस्थितीनुसार वेगवान खेळू शकतात. वानखेडे स्टेडियम लहान सीमारेषेमुळे फलंदाजांसाठी उपयुक्त आहे.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, जोस बटलर (यष्टीरक्षक/कर्णधार), डेव्हिड विली, आदिल रशीद, गस ऍटकिन्सन, मार्क वुड, रीस टोपली.