England vs South Africa, World Cup 2023: अफगाणिस्तानकडून अपमानास्पद पराभव स्वीकारल्यानंतर आज गतविजेत्या इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेकडून तब्बल २२९ धावांनी मानहानीकारक पराभव झाला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आले. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत सात गडी गमावून ३९९ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ २२ षटकांत केवळ १७० धावा करू शकला. या स्पर्धेतील विश्वविजेत्या संघाचा हा सलग तिसरा पराभव आहे. याबरोबरच दक्षिण आफ्रिकेला तिसरा विजय मिळाला आहे. या मोठ्या पराभवामुळे उपांत्य फेरीत जाण्याची त्यांची वाट खडतर झाली आहे.
इंग्लंडचा लाजिरवाणा पराभव
इंग्लंड संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सध्याच्या विश्वचषक स्पर्धेत गतविजेत्यांची खराब कामगिरी कायम आहे. त्याला चार सामन्यांत तिसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध इंग्लंडचा पराभव झाला आहे. त्यांचा एकमेव विजय बांगलादेशविरुद्ध होता. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने तिसरा विजय मिळवला आहे. त्याने श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा पराभव केला आहे. त्यांचा एकमेव पराभव नेदरलँडविरुद्ध झाला आहे. इंग्लंडचा पुढील सामना २६ ऑक्टोबरला बंगळुरूमध्ये श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. त्याचवेळी २४ ऑक्टोबरला आफ्रिकन संघ बांगलादेशविरुद्ध मुंबईत खेळणार आहे.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत सात गडी गमावून ३९९ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ २२ षटकांत केवळ १७० धावा करू शकला. त्यांच्या एकाही फलंदाजाने अर्धशतक झळकावले नाही. १०व्या क्रमांकावर फलंदाजी करताना मार्क वुडने सर्वाधिक नाबाद ४३ धावा केल्या. नवव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या गस अॅटिंकसनने ३५ धावा केल्या. इंग्लंडचा हा वन डे इतिहासातील सर्वात मोठा पराभव ठरला.
इंग्लंडचे दिग्गज फलंदाज अपयशी ठरले
हॅरी ब्रूक १७, जोस बटलर १५, डेव्हिड विली १२, जॉनी बेअरस्टो आणि आदिल रशीद प्रत्येकी १० धावा करून बाद झाले. डेव्हिड मलान ६ धावा केल्यानंतर, बेन स्टोक्स ५ धावा करून आणि जो रूट केवळ २ धावा करून बाद झाला. रीस टॉपली दुखापतीमुळे फलंदाजीला आला नाही. त्याच्या अनुपस्थित डाव घोषित करण्यात आला. दक्षिण आफ्रिकेकडून जेराल्ड कोएत्झीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. लुंगी एनगिडी आणि मार्को जॅनसेनने प्रत्येकी दोन गडी बाद केले. कागिसो रबाडा आणि केशव महाराज यांना प्रत्येकी एक गडी बाद करत त्यांना मदत केली.