England vs South Africa, World Cup 2023: विश्वचषकाच्या २०व्या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडसमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आज आमनेसामने आहेत. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय त्यालाच पश्चाताप करणारा ठरावा अशाप्रकारची दक्षिण आफ्रिकन संघाने अप्रतिम फलंदाजी करत ५० षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात ३९९ धावा केल्या. इंग्लंडला विजयासाठी ४०० धावांचे मोठे लक्ष्य दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंग्लंडला मिळाले कठीण लक्ष्य

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय इंग्लंडसाठी आतापर्यंत चुकीचा ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी आपला निर्णय चुकीचा ठरवत ५० षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात ३९९ धावा केल्या. इंग्लिश संघाला विजयासाठी ४०० धावांचे विक्रमी लक्ष्य गाठावे लागणार आहे. वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेने केला. त्यांनी पाकिस्तानला मागे टाकले आहे. पाकिस्तानने २०१९ मध्ये आठ विकेट्सच्या मोबदल्यात ३४८ धावा केल्या होत्या. एवढेच नाही तर वन डे क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्धची ही कोणत्याही संघाची सर्वात मोठी धावसंख्या आहे. या बाबतीत दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडचा विक्रम मोडला. २०१५ मध्ये न्यूझीलंडने ओव्हल मैदानावर पाच विकेट्सच्या मोबदल्यात ३९८ धावा केल्या होत्या.

दक्षिण आफ्रिकेकडून हेनरिक क्लासेनने शतक झळकावले. रॅसी व्हॅन डर डुसेन, रीझा हेंड्रिक्स आणि मार्को जॅनसेन यांनी अर्धशतके झळकावली. क्लासेनने ६७ चेंडूत १०९ धावा केल्या. त्याने १२ चौकार आणि चार षटकार मारले. हेंड्रिक्सने ७५ चेंडूत ८५ धावा केल्या. त्याने नऊ चौकार आणि तीन षटकार मारले. मार्को यानसेनने ४२ चेंडूत ७५ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार आणि सहा षटकार मारले. ड्युसेनने ६१ चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने ६० धावा केल्या. डेव्हिड मिलर पाच धावा करून बाद झाला, क्विंटन डी कॉकने चार आणि जेराल्ड कोएत्झीने तीन धावा केल्या. केशव महाराज एक धाव घेत नाबाद राहिला. इंग्लंडकडून रीस टोपलीने तीन विकेट्स घेतल्या. गस अॅटिन्सन आणि आदिल रशीदने प्रत्येकी दोन गडी बाद करत त्याला मदत केली.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बावुमा दुखापतग्रस्त; इंग्लंडचा बेन स्टोक्स परतला

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाला सामन्यापूर्वी दुखापत झाली. तो या सामन्यात खेळत नाही. त्याचबरोबर इंग्लंड संघात तीन बदल करण्यात आले आहेत. बेन स्टोक्स, गस ऍटिन्सन आणि डेव्हिड विलीचे पुनरागमन झाले आहे. सॅम कुरन आणि ख्रिस वोक्स सामन्यातून बाहेर आहेत.

हेही वाचा: World Cup 2023: राशिद खानने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी घेतली एम.एस. धोनीची भेट, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

दोन्ही संघांची प्लेइंग-११

दक्षिण आफ्रिका: क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सेन, जेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, कागिस रबाडा, लुंगी एनगिडी.

इंग्लंड: जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, जोस बटलर (विकेटकीपर), डेव्हिड विली, आदिल रशीद, गस एटिनसन, मार्क वुड, रीस टोपली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eng vs sa world cup defending champions england in tension because south africa set a target of 400 runs to win avw
Show comments